इंधन दरवाढीवरून नरेंद्र मोदींनी महाराष्ट्रासह राज्यांना सुनावले; म्हणाले की…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या देशात काही राज्यांमध्ये कोरोना विषाणूमध्ये वाढ होत आहे. त्यामुळे आगामी काळात मास्क वापरण्याबाबत निर्णय घेऊन निर्बंधही लावावे लागणार आहेत. तर दुसरीकडे देशभरात इंधनाचे दर वाढत आहेत. आदींसह अनेक विषयांवर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक राज्यातील मुख्यमंत्र्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह आरोग्यमंत्री डॉ. राजेश टोपे याचीही उपस्थिती होती. यावेळी मोदींनी इंधन दरवावाढीवरून महाराष्ट्रासह बिगर भाजपशासित राज्यांना सुनावले.

आज मुख्यमंत्र्यासोबत बैठकीत साधलेल्या संवादावेळी मोदी म्हणाले की, आम्ही नोव्हेंबर महिन्यात पेट्रोल आणि डिझेलवरील कर कमी केले होते. राज्यांनाही तसे करण्याचे आवाहन केले होते. मात्र काही राज्यांनी कर कमी केला पण काही राज्यांनी त्यांच्या राज्यातील लोकांना लाभ दिला नाही. त्यामुळे या राज्यांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर इतर राज्यांच्या तुलनेत जास्त आहेत. महाराष्ट्र, केरळ,पश्चिम बंगाल या राज्यांनी कर हा कमी न केल्यामुळे त्यांच्या राज्यातील लोकांवर एक प्रकारे अन्याय केल्यासारखे झाले आहे.

आम्ही केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत गुजरात आणि कर्नाटकने कर कमी केले आहेत. गुजरातने कर कमी केला नसता, तर त्यालाही साडेतीन हजार कोटींहून अधिक महसूल मिळाला असता. त्याचबरोबर काही राज्यांनी या काळात कर साडेतीन हजारांवरून साडेपाच हजारांवर आणला नाही. आता महाराष्ट्रसह काही राज्यांनी इंधन दरवाढीवरील कर कमी करावा, असेही मोदी यांनी सांगितले.

इंधन दरवाढीतील तफावतीची यादी दाखवली वाचून –

यावेळी नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रासह इतर राज्यात इंधन दरवाढीच्या आलेल्या किमतीतील तफावतीची यादीच वाचून दाखवली. मोदी म्हणाले की, महाराष्ट्रासह इतर राज्यांनी इंधनावरील कर कमी करुन नागरिकांना त्याचा लाभ द्या. माझे सर्व राज्यांना आवाहन आहे की, वैश्विक संकटाच्या काळात एक टीम म्हणून आपण काम करावंवे.आज चेन्नईत पेट्रोल 111 रुपये, जयपूरमध्ये 118 रुपये प्रति लिटर, हैदराबाद 119 हून अधिक, कोलकातामध्ये 115 हून अधिक, मुंबईत 120 हून अधिक आहे. तर ज्यांनी कपात केली आहे त्या ठिकाणी म्हणजेच मुंबईच्या शेजारी दीव दमण मध्ये 102 रुपये इतका दर आहे. कोलकातात 115 तर लखनऊमध्ये 105 रुपये दर आहे. जयपूरमध्ये 118 तर गुवाहाटीत 105 रुपये प्रति लिटर आहे, असे मोदी यांनी यावेळी म्हंटले.

कोरोना उपाय योजनांबाबत दिला हा’ सल्ला

सध्या देशात ओमिक्रॉन आणि कोरोनात वाढ होत आहे. याबाबतही मोदी यांनी मुख्यमंत्र्याशी संवाद साधला. यावेळी मोदी म्हणाले की, कोरोनाला रोखायचे असेल तर लसीकरणावर भर देणे आवश्यक आहे. त्यासाठी सर्व वयोगटानुसार सर्व पात्र बालकांचे लवकरात लवकर लसीकरण करणे ही आमची प्राथमिकता आहे. आपल्याला पूर्वीप्रमाणेच शाळांमध्येही विशेष मोहीम राबवावी लागणार आहे, असेही मोदी यांनी म्हंटले.