महाविकास आघाडी सत्तेत आल्यावर अजान सुरू झाली; नरेंद्र पाटील यांची टीका

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके

माथाडी कामगार नेते आणि भाजप प्रदेश उपाध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी आज उच्च न्यायालयाच्या अजानचा निर्णय, एसटी कामगारांच्या विलीनीकरणाच्या मागणीवरून महाविकास आघाडी सरकारवर व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर हल्लाबोल केला. “मुंबई उच्च न्यायालयाने अजान करणारे भोंगे काढण्यात यावेत असे आदेश दिल्यानंतर 2019 पूर्वी मशिदीवरील अजान बंद झाली होती. मात्र, महाविकास आघाडी सत्तेत आल्यावर अजान सुरू झाली आहे,”अशी टीका पाटील यांनी केली.

नरेंद्र पाटील यांनी आज सातारा येथे माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, उच्च न्यायालयाने आदेश देऊनही अजून अजान सुरूच आहे.पहाटेच्या अजानने इतर समाजाला त्रास होत असेल तर मुस्लिम समाजाने स्वतःहून भोंगे कमी केले पाहिजेत. मनसेने हा विषय घेतला असेल तरी न्यायालयाच्या निर्णयाची अंमलबजावणी करणे गरजेचे आहे.

यावेळी नरेंद्र पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावरही निशाणा साधला. यावेळी पाटील म्हणाले की, एसटी कर्मचाऱ्यांचा प्रश्न सुटला पाहिजे. अशी आमची इच्छा आहे. मात्र, उपमुख्यमंत्र्यांनी एसटी कामगारांना 31 मार्चची धमकी दिली. हे दुर्दैव आहे. कामगार चळवळीला पक्ष नसतो. सत्ताधारी एसटी कर्मचाऱ्यांना न्याय देऊ शकतात पण ते देत नाहीत हे दुर्दैव आहे.

सातारा जिल्ह्यात गुन्हेगारीत वाढ ही शोकांतिका – नरेंद्र पाटील

पाटण तालुक्यात अल्पवयीन मुलीवर अत्याचाराच्या घटनेवरून नरेंद्र पाटील यांनी गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्यावर निशाणा साधला. यावेळी पाटील म्हणाले की, गृहराज्यमंत्र्यांच्या पाटण तालुक्यात अत्याचाराच्या घटना वाढत आहेत. पाटण तालुक्यात कायदा, सुव्यवस्था राखणे गरजेचे असताना त्यांच्या जिल्ह्यात असे घडते आहे. राज्यात पोलिसांची दहशत राहिलेली नाही. पोलिसांनी अशा लोकांना गजाआड करावे. राजकारणात पोलिसांच्या गैरवापर केला जातोय पण गुन्हेगारांना पोलिसांचा वापर करू देऊ नका, असे पाटील यांनी सांगितले.