वॉशिंग्टन । हिमालयाच्या सौंदर्याच्या प्रेमात कोणतीही व्यक्ति पडेल. हिमालयाच्या सौंदर्याला कोणाच्या साक्षीची आवश्यकता नाही. त्यातच अंतराळातून पृथ्वी कशी दिसते हे अनेकांनी पाहिले असेल. मात्र, अंतराळातून हिमालय कसा दिसतो, याचे उत्तर आता सापडले आहे. आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात असलेल्या एका अंतराळवीराने हिमालयाचा एक फोटो आपल्या कॅमेऱ्यात कैद केला आहे. हा फोटो पाहून कोणीही पुन्हा एकदा हिमालयाच्या प्रेमात पडेल.
अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था नासाने हा फोटो शेअर केला आहे. यामध्ये बर्फाच्छादित हिमालय पर्वत दिसत आहे. जगातील सर्वात मोठी पर्वतरांग असणारा हिमालय हिंद आणि युरेशियन टेक्टॉनिक प्लेंटच्या धडकेतून निर्माण झाला आहे. हिमालयाच्या पर्वतरांगांच्या दक्षिण भागात भारत आणि पाकिस्तानचे कृषी क्षेत्र आहे.
हिमालयाच्या उत्तर भागात तिबेटचा पठारी भाग आहे. या भागाला जगाचे छप्पर म्हटले जाते. फोटोमध्ये भारताची राजधानी दिल्ली आणि पाकिस्तानमधील लाहोरमधील विद्युत दिवे दिसत असून यामुळे फोटो आणखीच जबरदस्त दिसत आहे. त्याशिवाय वायुमंडळातील पार्टिकल्स आणि सोलर रेडिएशन एकत्र आल्यामुळे एक नारंगी छटादेखील दिसते.
https://www.instagram.com/p/CI0aTEvpYgd/?utm_source=ig_web_copy_link
हिमालय पर्वतरांग ही जगातील सर्वात तरुण पर्वतरांग समजली जाते. जगभरातील इतर प्रमुख पर्वतांप्रमाणेच हा पर्वतही प्राचीन सागरीतळावर वलीकरण प्रक्रियेतून तयार झालेला पर्वत आहे. हिमालयाची लांबी सुमारे २५०० किमी असून रुंदी सुमारे १५० ते ४०० किमी इतकी आहे. तर क्षेत्रफळ सुमारे ५,००,००० चौ.किमी इतके आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’