नाशिक प्रतिनिधी | बिकन शेख
नाशिक जिल्ह्यातील येवला,सिन्नर, चांदवड, नांदगाव,देवळासह इतर तालुक्यात चारा आणि पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे. अद्यापही अनेक तालुक्यात उपाययोजना सुरू झालेल्या नाही. त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील दुष्काळी भागात जनावरांसाठी चारा छावण्या सुरु करून वाड्या वस्त्यांवर पिण्याच्या पाण्याचे टँकर तातडीने सुरू करण्यात यावे अशी मागणी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी नाशिकचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्याकडे केली. आज काँग्रेस राष्ट्रवादी मनसेच्या वतीने नाशिकचे नूतन जिल्हाधिकारी यांची सदिच्छा भेट घेऊन त्यांच्याशी दुष्काळाबाबत चर्चा करण्यात आली.
माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, संपूर्ण नाशिक जिल्हा भीषण दुष्काळाच्या छायेत आहे. पाणी टंचाई असलेल्या गांवे व वाड्यांवर ग्रामपंचायतीने मागणी केल्यानंतर तातडीने टँकर मंजूर करून पिण्याचे पाणी उपलब्ध करण्याची गरज आहे. मात्र अनेक तालुक्यांमध्ये वाडे-पाडे व वस्त्यांवर टँकर दिले जात नसल्यामुळे नागरिकांना तीव्र पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. माझ्या येवला मतदारसंघात पिण्याच्या पाण्यासाठी आंदोलने केली जात आहे.
ओझरखेड कालव्याला पिण्याच्या पाण्यासाठी १५ मार्च पर्यंत आवर्तन देण्याचे आश्वासन दिलेले होते. त्यानंतर १५ दिवस लोटले मात्र अद्याप आवर्तन सोडलेले नसल्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाल्याचे भुजबळांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.
यावेळी माजी खासदार देविदास पिंगळे, माजी आमदार डॉ.अपूर्व हिरे, मनसे नेते राहुल ढिकले, माजी महापौर अशोक मुर्तडक, नानासाहेब महाले, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष कोंडाजीमामा आव्हाड,शहराध्यक्ष रंजन ठाकरे, मनसेचे जिल्हाध्यक्ष अनंता सूर्यवंशी,अर्जुन टिळे आणि निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर आदी उपस्थित होते.