हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नाशिकमधील सातपीर दर्गा हटविण्यावरून 15 एप्रिलच्या मध्यरात्री मोठी दंगल उसळली. या दंगलीत अनेक पोलीस अधिकारी जखमी झाले असून, चार दिवसांपासून शहरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. आता हा तणाव हळूहळू निवळत असला, तरी या घटनांमागे पूर्वनियोजित कट असल्याचा संशय बळावला आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बीड येथे माध्यमांशी संवाद साधताना नाशिक दंगलीबाबत मोठे विधान केले.
दंगलीबाबत मोठे विधान –
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी नाशिक दंगलीबाबत मोठे विधान केले आहे, “दंगल ही जाणीवपूर्वक घडवण्यात आली. यामागे काही लोकांचा नियोजनबद्ध कट होता,” असा गंभीर आरोप त्यांनी केला. तसेच, “दंगलखोरांवर कडक कारवाई करण्यात येईल,” असा इशाराही त्यांनी दिला.
मुख्यमंत्री फडणवीस पुढे म्हणाले की, “न्यायालयाच्या आदेशानंतर स्थानिक नागरिकांनी अतिक्रमण स्वतः हटवण्याचे आश्वासन पोलिसांना दिले होते आणि त्यानुसार अतिक्रमण काढण्यास सुरुवातही झाली होती. मात्र काही अराजक प्रवृत्तींनी हेतुपुरस्सर विरोध करत दंगल घडवून आणली.”
व्यक्तींविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले –
या प्रकरणी नाशिकच्या मुंबई नाका पोलीस ठाण्यात 1400 ते 1500 अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये काही राजकीय पक्षांचे पदाधिकारीही असल्याची माहिती समोर आली आहे. एमआयएम पक्षाचे नाशिक शहराध्यक्ष मुख्तार शेख यांना पोलिसांनी अटक केली आहे.
या कालावधीत मनाई आदेश लागू –
दंगल अन तणावाच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरात 19 एप्रिल ते 3 मे 2025 दरम्यान मनाई आदेश लागू करण्यात आले आहेत. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशानुसार, या काळात शहरात कोणतेही आंदोलन, शस्त्र घेऊन फिरणे, चित्रप्रतिमा प्रदर्शन, दहन यास मनाई करण्यात आली आहे. संवेदनशील भागांमध्ये जमावबंदीचे आदेशही जारी करण्यात आले आहेत. शहरातील कायदा-सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिसांनी बंदोबस्त वाढवला असून, सोशल मीडियावर अफवा पसरवणाऱ्यांविरोधातही कडक कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.




