येवला ते सिन्नर…. यंदा नाशिकात विधानसभेला ‘हे’ निकाल डोळे फिरवतील

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नाशिक (Nashik) भल्याभल्यांना घाम फोडतो.. तसा बघायल गेलं तर राष्ट्रवादी आणि शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलेल्या नाशिककडे पक्षफुटीनंतर ठाकरे आणि शरद पवार यांनी जातीनं लक्ष दिलं…म्हणूनच की काय लोकसभेला नाशिकमध्ये महाविकास आघाडीची मशालीनं आसमंत उजळून निघाला. पण या निकालाने छगन भुजबळ, दादा भुसे, नरहरी झिरवळ, सुहास कांदे या आणि अशा अनेक विद्यमान आमदारांचं राजकारण येत्या निवडणुकीत दावणीला लागणार आहे…शरद पवार फुटलेल्यांना धडा शिकवण्यासाठी जिल्ह्यात आधीपासूनच राजकारण पेरु लागलेत.. तर ठाकरेही गद्दार विरुद्ध खुद्दार ही लाईन कायम ठेवत विधानसभेला याचा दुसरा राजकीय ट्रेलर दाखवण्यासाठी फिल्डींग लावतायत… म्हणूनच नाशकातील एकूण ६ विधानसभा मतदारसंघात येत्या विधानसभेला नेमकं कुणाच्या बाजूने वारं आहे? जिल्हातील कोणत्या मात्तबर नेत्याची विकेट आमदारकीला पडतीये? महाविकास आघाडी की महायुती नेमकं विधानसभेला जिल्ह्यात कोण भाव खाऊन जाणार? त्याचाच घेतलेला हा राजकीय आढावा..

यातला पहिला मतदारसंघ आहे तो येवल्याचा… राष्ट्रवादीतले बिग बी छगन भुजबळ यांचा हा बालेकिल्ला.. खरंतर भुजबळांची येवल्याच्या राजकारणात नेमकी कशी एन्ट्री कशी झाली हे पाहणंही फार इंटरेस्टींगय. मुंबईच्या माझगाव ताडवाडीतून भुजबळांचा पराभव झाला. शिवसेनेच्या बाळा नांदगावकरांनी त्यांना पराभूत केलं. त्यानंतर भुजबळयांनी येवला गाठलं. ते कायमचंच.. इथून त्यांना परंपरेने शिवसेना विरोधात लढत देत आले.., पण २००४ ला ३५ हजाराचं, २००९ ला ५० हजार, २०१४ ला ४६ हजार तर २०१९ ला तब्बल ७० हजारांचं लीड घेत भुजबळांनी येवल्याची सीट काढली यावरुन त्यांची क्रेझ आपल्याला समजू शकते….या चारही निवडणुकीतील एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे भुजबळांच्या विरोधात चारही वेळा मराठा उमेदवार उभे होते.. पण ओबिसींचे नेते म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भुजबळांच्या विरोधात ओबिसी कार्ड कधीच चाललं नाही.. मागच्या दोन्ही निवडणुकीत त्यांनी संभाजी पवारांना मात देत येवल्याची आमदारकी पटकावली होती… पण २०२४ उजाडताना चित्र सगळं बदललंय… भुजबळ अजित पवार गटात आहेत.. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन ते आधीच बॅकफूटला फेकले गेलेत… शरद पवारांनीही पक्षफुटीनंतर येवल्यातूनच पहिली सभा घेतल्यानं आता तुतारीचं टार्गेट भुजबळ असणार हे तर फिक्स आहे… येवल्यात मराठा समाज हा निवडणुकीत हा निर्णायक मतदान करत आलाय. त्यात महाविकास आघाडीने एक्सट्रा एफर्ट लावले तरी भुजबळ यंदा पराभवाच्या काठावर आहेत, असं म्हणायला हरकत नाही… बाकी भुजबळांच्या विरोधात शिवसेनाच इथून लढत देत असल्यानं आघाडीत ठाकरे गटाचे उमेदवार संभाजी पवार यांनाच ही जागा सुटेल, अशी चिन्ह आहेत..

YouTube video player

दुसरा विधानसभा मतदारसंघ येतो तो दिंडोरी… राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार नरहरी झिरवळ दिंडोरीचे विद्यमान आमदार… विधानसभेचे ते उपाध्यक्षही राहिले… अनुसूचित जातीसाठी राखीव असणाऱ्या मतदारसंघांमध्ये 2004 पासून केवळ 2009 चा अपवाद वगळता झिरवळ यांनी आमदारकी कायम ठेवलीय… विधानसभेतलं एक अवलिया व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं… पण अजित पवार गटात गेल्याने मतदारसंघातला स्थानिक राष्ट्रवादीतील कार्यकर्ता त्यांच्यावर नाराज झाला आहे…या नाराजीचा फटका येणाऱ्या विधानसभेला त्यांना बसू शकतो…म्हणूनच ते शरद पवार गटाकडून उमेदवारी मिळावी, यासाठी हालचाल करत असल्याचं सूत्रांकडून समजतं…माजी आमदार धनराज महाले आणि सध्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात असलेले रामदास चारोस्कर हे दोन्ही नेते पुन्हा एकदा विधानसभेच्या तयारीला लागले आहेत. या दोघांचीही सातत्याने पक्ष बदलण्याची परंपरा आहे. या परंपरेमुळे हे नेते सध्या ज्या पक्षात आहेत, त्या पक्षाला दिंडोरीत जागा वाटपात स्थान नसेल. त्यामुळे या दोन्ही नेत्यांसह अन्य इच्छुकांची चांगलीच राजकीय कोंडी झाली आहे…. पण शिवसेना शिंदे गट किंवा राष्ट्रवादी शरद पवार गट दिंडोरीतून आमदारकीचा गुलाल उधळेल, अशी सध्या चिन्ह आहेत…

तिसरा मतदारसंघ पाहूया नांदगावचा…महाराष्ट्राच्या पॉलिटिक्स मधले बिग बी छगन भुजबळ यांचे सुपुत्र पंकज भुजबळ यांच्या सलग दोन टर्मच्या विजयाला ब्रेक लावत शिवसेनेचे सुभाष कांदे जायंट किलर ठरले… आणि नांदगावची आमदारकी राष्ट्रवादीकडून स्वतःच्या ताब्यात घेतली… छगन भुजबळांचं वलय असतानाही पंकज भुजबळ यांचा पराभव हा नक्कीच जिव्हारी लागणारा होता…यानंतर सुहास कांदे आणि छगन भुजबळ यांच्यातला वाद तर उभ्या महाराष्ट्राला ठाऊक आहे…पण असं असतानाही शिंदे आणि अजित पवार एकाच गटात आल्यामुळे आता नांदगावचा महायुतीचा उमेदवार कोण? हा मोठा प्रश्न आहे… छगन भुजबळ आणि एकनाथ शिंदे या जागेसाठी मोठा रस्सीखेच करू शकतात… पण स्टॅंडिंग आमदारांनाच तिकीट द्यायचं असा फॉर्मुला ठरला तर इथल्या निवडणुकीत पाडापाडीचा कार्यक्रम होऊ शकतो, एवढं मात्र नक्की…

चौथा मतदारसंघ आहे सिन्नरचा…राष्ट्रवादी अजित पवार गटाचे माणिकराव कोकाटे सिन्नरचे विद्यमान आमदार… व्यक्ती केंद्रित, नातेगोते आणि जातीवर आधारित, राजकीय समज असणारा मतदारसंघ म्हणून सिन्नरकरांची ओळख… 2014 विधानसभा निवडणुकीत मोदी लाटेतही राजाभाऊ वाजे यांनी शिवसेनचा भगवा सिन्नरवर डौलाने फडकवला… कॉंग्रेस, शिवसेना असा प्रवास करून भाजपमध्ये आलेल्या माणिकराव कोकाटे यांचा त्यांनी तब्बल 20 हजारांच्या लीडने पराभव केला… पण 2019 ला लोकसभेच्या तोंडावर अपक्ष निवडणुक लढवत युती धर्माला फाट्यावर मारत त्यांनी तब्बल लाखभर मतं पदरात पाडून घेतली.. सर्वात महत्वाचं म्हणजे सिन्नरकर जनतेनं त्यांना ३५ हजारांचं लीड मिळालं होतं.. थोडक्यात लोकसभेला पराभव झाला असला तरी सिन्नरमध्ये मिळालेलं लीड पाहता त्यांची आमदारकी कन्फर्म समजली जात होती.. यासाठी त्यांनी वाट धरली राष्ट्रवादीची.. घड्याळाच्या चिन्हावर निवडणुक लढवत त्यांनी युतीच्या राजाभाऊ वाजेंना मात देत आमदारकी पुन्हा एकदा खेचून आणलीच… पण आता सिन्नरमध्ये उलटं वारं वाहू लागलंय..कोकाटे अजित पवार गटात असतानाही सिन्नरमधून सर्वाधिक लीड राजाभाऊ वाजेंना मिळालंय.. कोकाटे यांनी आपला आमदारकीचा मार्ग मोकळा करण्यासाठी राजाभाऊ वाजे यांना अंतर्गत पाठिंबा दिल्याचीही चर्चा मतदारसंघात आहे.. त्यामुळे खासदारकीच्या मदतीची परतफेड वाजे आमदारकीला कोकाटेंना मदत देऊन करतील, अशी मतदारसंघात चर्चा आहे… पण कोकाटे यांच्यासमोर फक्त एका चेहऱ्याचं आव्हान असणार आहे ते म्हणजे उदय सांगळे… नाशिकच्या राजकारणात एक्टीव्ह असणारे सांगळे विधानसभेला भिडण्याची इच्छा व्यक्त करतील का, यावर सिन्नरचा आमदार कोण? हे अगदी स्पष्टपणे सांगत येत.. मात्र सध्यातरी कोकाटे इथं प्लसमध्ये आहेत, एवढं मात्र नक्की…

पाचवा मतदारसंघ येतो तो चांदवड …. देवी रेणुकामाता आणि अहिल्याबाई होळकरांच्या भरीव कामांंमुळे ओळखला जाणारा चांदवडचा पट्टा… पण इथला पाणीप्रश्न मतदारसंघाच्या पाचवीलाच पुजल्यानं 1985 ते 1999 पर्यंत भाजपाचे दिवंगत जयचंद कासलीवाल यांनी या मतदारसंघाचं एकहाती नेतृत्व केलं, पण त्यांना पाण्याचा प्रश्न काही मार्गी लावता आला नाही.. पण 1999 मध्ये कासलीवाल यांचे पारंपारिक काँग्रेसमध्ये असणारे विरोधक शिरीष कोतवाल यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करत चांदवडची आमदारकी खेचून आणली.. याकाळात त्यांनी पाण्यासाठी राबवलेल्या विवीध योजनांचं बरंच कौतुक झालं.. यानंतर सत्ता बदलत राहील्या.. पण २०१४ ला मतदारसंघाला नवं नेतृत्व मिळालं… माजी मंत्री दौलतराव आहेर यांचे सुपुत्र डॉ. राहुल आहेर यांनी भाजपच्या तिकीटावरुन मतदारसंघात उडी घेतली… देवळा वरील पकड, कारखानदारी, जलयुक्त शिवाराची कामं आणि विवीध विकासकामांच्या जिवांवर डॉ. राहुल आहेर मागील सलग दोन टर्म निवडून येतायत.. शिरीषकुमार कोतवाल हे प्रत्येकवेळस प्रयत्न करतात, पण त्यांना मात्र आहेरांचं लीड आत्तापर्यंत तोडता आलेलं नाहीये.. त्यामुळे मतदारसंघात भाजप स्ट्राँग पोजिशनला आहे… म्हणूनच की काय निगेटीव्ह वातावरण असताना.. भारती पवार यांचा पराभव झालेला असतानाही या मतदारसंघातून भाजपला लीड मिळालं होतं.. त्यामुळे आहेरांची आमदारकी सध्यातरी सेफ झोन मध्ये आहे.. त्यांच्या विरोधात यंदाही काँग्रेसकडून शिरीष कोतवाल फाईट देणार असले तरी शरद पवार गट आणि ठाकरे गटालाही या मतदारसंघाची भुरळ पडल्यानं चांदवड मध्ये चेहरा बदलतोय, याची आधीच चाहूल विरोधकांना लागलीय की काय, असा प्रश्नही यानिम्मिताने पडतोय..

आता येतं ते मालेगाव बाह्य… दाभाडी मतदार संघ आता मालेगाव बाह्य मतदार संघ म्हणून ओळखला जातो… काँग्रेस आणि पर्यायानं हिरे घराण्याच्या या मालेगाव बाह्य वर दबदबा राहीलाय.. भाऊसाहेब हिरे, डॉ.बळीराम हिरे, पुष्पाताई हिरे नंतर प्रशांत हिरे यांनी एकदा शिवसेना आणि त्यानंतर राष्ट्रवादीत जाऊन मंत्रीपदं मिळवलं.. पण २००४ मध्ये मालेगाव बाह्यच्या राजकारणात दादा भुसे या नावाची एण्ट्री झाली… शिवसेना आणि भाजप नेत्यांनी निवडणुकीच्या रिंगणात अपक्ष उभे राहिलेल्या दादा भुसे या नावाच्या मागे ताकद लावली.. दाभाडीच्या मतदारांनी बदल घडवत प्रथमच हिरे घरण्याला बाजूला सारले आणि दादा भुसेंच्या रुपाने नवीन चेहरा मतदारांनी स्वीकारला. 2009 च्या निवडणुकीत अधिकृतपणे सेनेच्या तिकिटावर उमेदवारी मिळवत पुन्हा एकदा भुसे यांनी प्रशांत हिरे यांचा मोठ्या मताधिक्याने पराभव केला. विकासकामांचा धडाका, स्थानिक स्वराज्य संस्था, सहकार आणि पक्ष वाढवण्याबरोबर मतदारांच्या हाकेला धावून जाणारा शिवसैनिक अशी त्यांची ओळख निर्माण केली त्याच्याच जीवावर २००४ ला ते पुन्हा निवडून आले… युतीच्या सत्तेत शिवसेनेने त्यांची ग्रामविकास राज्यमंत्री पदावर वर्णी लावली… मंत्रीपदं, पालकमंत्री असणाऱ्या दादा भुसे यांचं राजकारणाचा प्रभाव आता जिल्ह्यावर पडतो अशी सध्याची परिस्थिती आहे.. नुकत्याच लोकसभेच्या निवडणुकीत महायुतीच्या उमेदवाराच्या पाठीशी मतदारसंघातून राहीलेलं लीड पाहता शिवसेनेच्या बंडाळीला साथ दिल्यानं इमेज डॅमेज झाली असली तरी भुसेंचा यंदाही पराभव करण अशक्यच दिसतंय.. भुसेंच्या या नाॅन स्टाॅप गाडीला ब्रेक लावायचा असेल, तर विरोधकांना एक्सट्रा एफर्ट घ्यावे लागणारयत, एवढं मात्र नक्की.. तर ही होती नाशकातली काही प्रमुख राजकीय मंडळी ज्यांची आमदारकी धोक्यात आहे का सेफ आहे? याचा आढावा आपण घेतला.. बाकी तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला? ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.