कोल्हापूर प्रतिनिधी ।सतेज औंधकर
केंद्र सरकारच्या कामगार विरोधी आणि नागरिकविरोधी धोरणांच्या निषेधार्थ आणि विविध प्रलंबित मागण्यांसाठी आज पुकारण्यात आलेल्या देशव्यापी संपात आज कोल्हापुर जिल्ह्यातील सुमारे ३ लाख कर्मचारी सहभागी झाले होते. यावेळी टाऊन हॉल चौकातून काढलेल्या मोर्चात २५ हजार पेक्षा अधिक कर्मचारी सहभागी झाले होते. मोर्चात केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. या मोर्चामुळे शहरातील वाहतूक व्यवस्था मात्र पूर्णतः कोलमडली होती.
देशव्यापी पुकारलेल्या संपाला कोल्हापूर जिल्ह्यात विविध संघटनांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत शांततेत मोर्चा काढला होता. टाऊन हॉल परिसरातून निघालेला हा मोर्चा शिवाजी पुतळा मार्गे मुख्य रस्त्यावरून बिंदू चौकात समाप्त झाला. या मोर्चात कोल्हापूर जिल्ह्यातील विविध शासकीय संघटना,शिक्षक, प्राध्यापक,डाव्या चळवळीतील संघटना सह इतर संघटना देखील मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. या वेळी मोर्चे केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. आजच्या संपामुळं शहरातील काही काळ शासकीय कार्यालय ओस पडलेली पाहायला मिळाली तसचं विविध सेवांवर या संपाचा मोठा परिणाम जाणवला आहे.