एक ठार, दोन जखमी : दुचाकीवरील ताबा सुटल्याने राष्ट्रीय महामार्गावर अपघात

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड | पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर कराड तालुक्यातील नांदलापूर गावच्या हद्दीत दुचाकीची अज्ञात वाहनाला धडक बसल्याने दुचाकीवर पाठीमागे बसलेल्या महीलेचा रस्त्यावर आदळून जागीच मृत्यू झाला. तर तीन वर्षाच्या मुलीसह युवक गंभीर जखमी झाला. बुधवारी रात्री सव्वादहा वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला.

प्रतिक्षा बाबासाहेब तोंदले (वय- 26, रा. यादवनगर, कोल्हापूर) असे अपघातात ठार झालेल्या युवतीचे नाव आहे. तर अनिकेत अभिजीत आठवले (वय- 24, रा. एकता कॉलनी, मिरज) आणि झोया (वय- 3) हे दोघे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोल्हापुरातील प्रतिक्षा हिच्यासह तीची मुलगी झोया व मिरज येथील अनिकेत आठवले हे तिघेजण बुधवारी रात्री दुचाकीवरुन (क्र. एमएच- 10 डीके- 6042) कोल्हापुरहून साताऱ्याच्या दिशेने निघाले होते. रात्री सव्वादहा वाजण्याच्या सुमारास ते नांदलापूर गावच्या हद्दीत आले असताना अनिकेतचा दुचाकीवरील ताबा सुटला. त्यामुळे पुढे जाणाऱ्या अज्ञात वाहनाला दुचाकीची धडक बसली. या धडकेत प्रतिक्षासह झोया व अनिकेत रस्त्यावर आदळून गंभीर जखमी झाले. याचवेळी महामार्गावर पेट्रोलिंग करणारे कराड शहर पोलीस ठाण्यातील नाईक किरण बामणे हे त्याठिकाणी पोहोचले. त्यांनी जखमींना उपचारार्थ रुग्णालयात हलवले. मात्र, उपचारापुर्वीच प्रतिक्षाचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगीतले. तर जखमी झोया व अनिकेत यांच्यावर उपचार सुरू आहेत.

दरम्यान, अपघातास आणि प्रतिक्षा तोंदले हिच्या मृत्यूस कारणीभुत ठरल्याप्रकरणी दुचाकीचालक अनिकेत आठवले याच्यावर कराड शहर पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलीस नाईक किरण बामणे यांनी याबाबतची फिर्याद दिली आहे.

Leave a Comment