हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आज देशाचा 74 वा स्वातंत्र्य दिवस . पंतप्रधान मोदींनी प्रथेप्रमाणे भारताचा तिरंगा लाल किल्ल्यावर फडकावून देशवासियांना संबोधित केले. देशात सर्वत्र स्वातंत्र्यदिन आनंदात साजरा केला जात आहे. मात्र भारताची आन, शान आणि भारताचा मानबिंदू असलेला आपला राष्ट्रध्वज – तिरंगा याच्यविषयी आपल्याला बरेचवेळा फारच कमी माहिती असते. आजच्या स्वातंत्र्यदिनी आपल्या तिरंग्याविषयी जाणून घेऊया.
भगवा, पांढरा, हिरवा आणि मधोमध निळ्या रंगाचे अशोकचक्र असलेला हा ध्वज फार विचार करून बनविला गेला आहे. ध्वजाचा प्रत्येक रंग आणि अशोकचक्र ही विशिष्ठ गुणांची द्योतक आहेत.
भगवा किंवा केशरी हे त्याग आणि धैर्याचे प्रतीक आहे. पांढरा प्रकाश, शांती आणि सत्याची भावना व्यक्त करणारा तर हिरवा समृद्धी आणि निसगाचे भूमीशी असलेले नाते व्यक्त करणारा रंग. मधले निळे अशोकचक्र हे सागराची अथांगता आणि कालचक्राचे द्योतक आहे. हे अशोकचक्र म्हणजे जगाला विश्वशांतीचा संदेश देणारे बौद्ध धर्माचे प्रतीक असलेले धम्मचक्र आहे.
आपल्या राष्ट्रध्वजाचा मान सर्व भारतीयांनी ठेवला पाहिजे. कोणत्याही परिस्थितीत राष्ट्रध्वजाचा अपमान होणार नाही याची काळजी घेतली गेली पाहिजे. राष्ट्रध्वज कधीही फाटलेला, मळलेला असू नये तसेच तो कुठेही कसाही फेकलेलाही असू नये आणि याची शिकवण बालपणापासूनच मुलांमध्ये रूजविली जाईल याची दक्षता घेतली गेली पाहिजे तरच आपली भावी पिढी राष्ट्रध्वज आणि पर्यायाने देशाची मान ताठ ठेवण्यास जागरूक राहु शकेल.
देशाची अस्मिता दर्शविणारा हा राष्ट्रीय ध्वज कसा असावा, कसा वापरावा आणि कधी वापरावा याचे नियम भारतीय घटनेने घालून दिलेले आहेत. हा ध्वज खादी, रेशमी अथवा लोकरी कापडापासून बनविला जावा तसेच त्याची लांबी रूंदी ३ : २ अशा प्रमाणात असावी. ध्वज फडविताना तो सगळ्यांना दिसेल अशा सन्मानपूर्वक उच्च स्थानावरून फडकविला जावा. शासकीय इमारतींवर कोणत्याही हवामानात तो सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत फडकत राहावा व सूर्यास्तानंतर उतरविताना बिगूल वाजवून अगदी हळूहळू आदरपूर्वक उतरविला जावा. केवळ प्रजासत्ताक दिन आणि स्वातंत्र्यदिनादिवशीच तो फुलांच्या पाकळ्या ठेवून फडकविला जातो.