अकलुज | पुण्यात कोरोनाचा रुग्ण सापडल्यानंतर सरकारने सुरुवातीला ज्या गोष्टी बंद केल्या त्यात म्हाळुंगे-बालेवाडी येथील श्री. शिवछत्रपती क्रीडासंकुल ही बंद करण्यात आले. येथे राष्ट्रीय व अंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचे व राज्याचे प्रतिनिधित्व करणारे खेळाडू राहतात व सराव करतात. या सगळ्यांना संकुल खाली करण्यास सांगण्यात आले. पृथ्वी माने हे महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील अकलूज गावचे राष्ट्रीय पातळीवरील नेमबाज आहेत. त्यांनी लागलीच आपले गाव अकलूज गाठले. राष्ट्रकुल पदक विजेत्या अंजली भागवत या त्यांच्या या क्षेत्रातील गुरू आहेत. खेळाबरोबर इतर करिअर जपावं, इतर जबाबदाऱ्या पण तितक्याच यशस्वीपणे पार पाडाव्यात, खेळातीलच नव्हे तर आयुष्यातील आव्हांनांचा सुद्धा पाठलाग करावा’, असं अंजली मॅडम नेहमी त्यांना सांगत असत. त्यानुसार आता या लॉकडाऊन च्या काळात गावाकडे शेतीत लक्ष घालण्याचे त्यांनी ठरवले आहे.
गेली सहा वर्षे अंजली भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करत असल्याने पृथ्वी यांच्यावर त्यांच्या विचारांचा खूप प्रभाव आहे. “जितकं माझं त्यांच्यावर प्रेम तितकच त्याचंही माझ्यावर आहे. नेमबाजी बरोबरच आधुनिक शेती करावी हा त्यांचाच सल्ला आहे. कुठल्याही नोकरीस त्यांचा विरोध आहे. माझ्या आईची व बहिणीची हीच इच्छा आहे तसेच बाबांचाही पाठिंबा आहे” असं पृथ्वी बोलताना म्हणाले.
नेमबाजीची आवड असणारे पृथ्वी माने सध्या रोज शेतात जात आहेत. लॉकडाऊनच्या काळात शेतीच्या कामांसाठी बंदी नाही याचा सदुपयोग करून घ्यायचा त्यांचा विचार आहे. नेमबाजी या खेळामध्ये मानसिकतेचा कस लागतो म्हणून मनावरील जास्तीचा ताण कमी करण्यासाठी अश्या इतर कामांमध्ये गुंतवणूक करावी लागते. शेती हा या कठीण काळात सर्वोत्तम पर्याय आहे असे त्यांना वाटते.
घरची शेती मोठी, अकलूज सारखे शेतीसाठीचे पोषक वातावरण,भीमा नदीवरील उजनी धरणाचा कॅनॉल व शेतातील विहिरी मुळे पाण्याची संपन्नता, कसदार जमीन या जोडीला माझं सुपीक डोकं वापरल्याने शेतीचा हा प्रयोग नक्की यशस्वी होईल याची त्यांना खात्री आहे. सध्याची शेती पारंपरिक नसल्याने व रासायनीक खतांच्या बेसुमार वापरामुळे जमीनी पडीक होत आहेत तसेच बाजारपेठांची माहिती न घेता पिकं घेतली जातात याचा परिणाम उत्पन्नावर होतो व शेती तोट्यात जाते. शेतीचा हा आव्हानात्मक प्रयोग आधुनिक तंत्रज्ञान व सेंद्रिय खतांच्या वापराने करायचा पृथ्वी यांचा मानस आहे.
आईची शेतीबद्दलची धडपड लहानपणापासून पाहिलेली असल्यामुळे व माहितीच्या अभावामुळे तिची असहायताही दिसून आल्याने पृथ्वी यांनी शेतीत जोमदार लक्ष घालण्याचे ठरवले आहे. कोरोनाचे वातावरण संपल्यावर क्रीडासंकुल परत सुरू झाल्यावर तुम्ही काय करणार असा प्रश्न उपस्थित झाल्यास ते म्हणतात, “नेमबाजी करत या गोष्टी मी सांभाळू शकतो याची मला खात्री आहे. मी नेमबाजीत आयुष्यभर राहणार आहे. खेळाडू म्हणून मोठी कारकीर्द घडवण्याची माझी इच्छा आहे. त्यासाठी प्रयत्न सुरूच राहणार आहेत. पुढे निवृत्तीनंतर कोचिंग हा सुद्धा एक करिअर चा पर्याय म्हणून माझ्यासमोर कायम उपलब्ध आहे. पण शेतीकडेही आता नेमबाजी सोबत लक्ष देणार आहे. थोडक्यात, शेती आणि नेमबाजी अशी दुर्मिळ सांगड मला आनंदाने घालायची आहे.”
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’
हे पण वाचा –
तबलिगी प्रकरण, मुस्लिमांना दोष आणि कायद्याचं खरं रुप – फैझान मुस्तफा
‘कोरोना’ आणि ‘व्हायरस’ नावाची भानगड नक्की काय आहे ??
कोविड -१९ च्या लसीची उंदीरांवर यशस्वी चाचणी; जाणून घ्या
लॉकडाउन उठवण्यापेक्षा केंद्र सरकार घेऊ शकते ‘हा’ निर्णय
६ CRPF जवानांची करोना टेस्ट पॉझिटिव्ह
करोनामुळे मृत्यू झाल्यास पोलिसांच्या कुटुंबियांना ५० लाख देणार- अजित पवार