कराड प्रतिनिधी| सकलेन मुलाणी
अखिल भारतीय धोबी महासंघाच्या वतीने प्रतिवर्षी सामाजिक कार्य करणाऱ्या विविध मान्यवरांचा देशपातळीवर पुरस्कार देऊन सन्मान केला जातो. यावर्षी परीट समाजाचे सातारा जिल्हाध्यक्ष प्रकाश जाधव यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. त्याबद्दल त्यांचे विविध स्तरातून अभिनंदन होत आहे. आजपर्यंतच्या एकूण कार्याची दखल घेत प्रकाश जाधव यांची पुरस्कारासाठी निवड झाली आहे. अखिल भारतीय धोबी महासंघाचे वरिष्ठ उपाध्यक्ष एकनाथराव बोरसे यांनी याबाबतचे पत्र त्यांना दिले आहे.
परीट समाजाचे जिल्ह्याचे नेतृत्व करताना समाजाभिमुख कार्य करत प्रकाश जाधव यांनी आपला आदर्श ठेवला आहे. आजपर्यंत त्यांच्या या कार्यातून परीट समाजासह इतर जातीधर्मातील गरजूंना देखील मोठी मदत झाली आहे. समाजातील अनेक घटकांच्या अडचणी दूर करण्यासाठी संघटनेच्या माध्यमातून त्यांचे समाजकार्य अखंड असे चालूच असते. त्यांच्या या कार्याची दखल घेत त्यांची या राष्ट्रीय पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. जाधव यांना यापूर्वीही त्यांच्या समाजकार्याची दखल घेत पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे
त्यांच्या निवडीबद्दल महाराष्ट्र धोबी (परीट) मंडळाचे प्रदेशाध्यक्ष राजेंद्र खैरनार, मार्गदर्शक राजेंद्र शेठ आहेर, राष्ट्रीय अध्यक्ष कृष्णकुमार कनौजिया महासचिव एस एन जुपैली, महाराष्ट्र राज्याचे संघटक सुरेश नाशिककर, महिला प्रदेश उपाध्यक्ष सुमनताई परीट आदी मान्यवरांनी जाधव यांचे अभिनंदन केले.