नवज्योत सिंग सिद्धूंनी सोनिया गांधींकडे दिला प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नुकत्याच पाच राज्यांच्या निवडणुका पार पडल्या. या पाचही राज्यात काँग्रेसचा दारुण पराभव झाला. या पराभवाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी पक्षातील खासदार, प्रदेशाध्यक्षांची तातडीची बैठक घेतली. तसेच प्रदेशाध्यक्षांना राजीनामा देण्याच्या सूचना केल्या. त्यानुसार पंजाबमधील सत्ता गेल्याने काँग्रेसचेप्रदेशाध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू यांनी आज आपला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे दिला आहे.

काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी दिल्लीत घेतलेल्या बैठकीत उत्तर प्रदेश, गोवा, पंजाब, उत्तराखंड आणि मणिपूर या पाचही राज्यातील प्रदेशाध्यक्षांचे राजीनामे मागितले होते. त्यानुसार सिद्धू यांनी राजीनामा दिला. राजीनामा देताच त्याबाबतची माहिती सिद्धू यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून राजीनामा देत असल्याचे सांगितले. आपण आपल्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा हायकमांडच्या इच्छेनुसारच देत असल्याचे सिद्धू यांनी म्हटले.

नवज्योत सिंग सिद्धू यांनी ट्विट करून राजीनामा देण्यात आल्याचे पत्रंही पोस्ट केले. सिद्धूंना गेल्यावर्षी जुलैमध्ये काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्त करण्यात आलं होतं. कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतरही सिद्धू यांनी सातत्याने आपल्याच पक्षावर हल्लाबोल सुरू ठेवला होता. दरम्यान त्यांनी आता आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.