हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । AIMIM चे हैद्राबादचे खासदार असदुद्दीन ओवैसी (Asaduddin Owaisi) यांनी संसदेत खासदारकीची शपथ घेत असताना जय पॅलेस्टाईनचा नारा दिला. ओवैसी यांच्या या नाऱ्यानंतर देशभरातील भाजप नेत्यांनी निषेध व्यक्त करत ओवैसी यांच्यावर निशाणा साधला. ओवैसी यांनी दुसऱ्या देशाच्या घोषणा दिल्याबद्दल त्यांची खासदारकी रद्द करण्यात यावी अशी मागणीही सध्या जोर धरत आहे. या एकूण सर्व घडामोडीत आता भाजप नेत्या आणि अमरावतीच्या माजी खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांनी उडी घेतली असून ओवैसी यांची खासदारकी रद्द करण्याची विनंती त्यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केली आहे. त्याबाबतचे पत्र नवनीत राणा यांनी राष्ट्रपतींना लिहिलं आहे.
नवनीत राणा यांचं पत्र जसच्या तस
आदरणीय महोदय,
26/06/2024 रोजी, श्री असरुद्दीन ओवेसी यांनी संसद सदस्य म्हणून शपथ घेतली ते 09 हैदराबाद लोकसभा मतदारसंघातून निवडून आले आहेत. शपथ घेतल्यानंतर लगेचच त्यांनी लोकसभा सभागृहात जय पॅलेस्टाईनची घोषणा केली. पॅलेस्टाईन हा एक परदेशी देश आहे ज्याचा कोणत्याही भारतीय नागरिकाशी किंवा भारतीय संविधानाशी संबंध नाही. भारतीय राज्यघटनेच्या कलम 102 नुसार, संसदेच्या कोणत्याही सदस्याने इतर कोणत्याही राष्ट्राप्रती आपली निष्ठा किंवा दृढनिश्चय दर्शविल्यास किंवा त्याने असे कृत्य केल्यास त्याचे संसद सदस्यत्व नाकारले जाऊ शकते. श्री असरुद्दीन ओवेसी यांनी लोकसभा सदस्य म्हणून शपथ घेतल्यानंतर लगेचच जय पॅलेस्टाईनचा नारा देऊन या राष्ट्राप्रती आपली निष्ठा आणि भक्ती दाखवली आहे, जे संविधानाचे उल्लंघन आहे. ही अत्यंत गंभीर बाब असून देशाच्या अंतर्गत सुरक्षेसाठीही घातक ठरू शकते.
देशाची एकता आणि अखंडता राखणे हे प्रत्येक भारतीय नागरिकाचे कर्तव्य आहे, संसद सदस्य असूनही श्री असरुद्दीन ओवेसी यांनी या कर्तव्याचे खुलेआम उल्लंघन केले आहे, हा एक प्रकारचा देशद्रोह आहे. कलम 102 1(m) नुसार, जर कोणत्याही व्यक्तीने इतर कोणत्याही राष्ट्रासाठी आपली निष्ठा किंवा दृढनिश्चय व्यक्त केला, तर तो संसद सदस्य म्हणून काम करू शकत नाही. त्यामुळे आपणास विनंती करण्यात येते की, श्री असरुद्दीन ओवेसी यांनी लोकसभेत केलेले हे विधान हे देशविरोधी कृत्य आहे जे भारत देशाची एकता, अखंडता आणि अंतर्गत सुरक्षेसाठी घातक ठरू शकते. कृपया कलम 103 नुसार भारतीय निवडणूक आयोगाचे मत मागवून या प्रकरणाची चौकशी करून श्री असरुद्दीन ओवेसी यांचे संसद सदस्यत्व नाकारण्यात यावे.
धन्यवाद!
तुमची
सौ. नवनीत रवी राणा (माजी खासदार अमरावती)