बॉलिवूडला बदनाम करण्याचं काम सुरू, पुढील टार्गेट शाहरुख खान; नवाब मलिकांचा आरोप

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मुंबई येथील क्रुझ पार्टीवर टाकलेल्या धाडीवरून राज्यात एकच खळबळ उडाली आहे. ड्रग सेवन केल्याप्रकरणी शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान सध्या एनसीबीच्या ताब्यात आहे. ड्रग्ज प्रकरणावरून बॉलिवूडला बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू असून एनसीबी चे पुढील लक्ष शाहरुख खान असेल असा खळबळजनक दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे. त्यामुळे राज्यात आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे.

अंमली पदार्थ विरोधी पथक प्रसिद्धी मिळवण्यासाठी लोकांना चौकशीसाठी बोलवत आहे. यामध्ये रिया चक्रवर्ती, दीपिका पदूकोण, अर्जून रामपाल किंवा भारती सिंग असेल. किती दिवस या लोकांना बोलवून दिवसभर ते मीडियावर बातम्या चालवणार. बॉलिवूडला बदनाम करण्याचं काम सुरू असून आता पुढचं टार्गेट शाहरूख खान आहे, असा दावा ही नवाब मलिक यांनी केला आहे.

एनसीबी आणि भाजपच्या संगमताने बॉलिवूडला बदनाम करणे आणि बऱ्याच लोकांच्या मनात भीती निर्माण करून पैसे काढण्याचे उद्योग सुरू आहेत, असं सांगतानाच कुणाचे कुणाशी काय लागेबांधे आहेत, याची माहिती मी पुढील काळात देणार आहे, असं मलिक यांनी स्पष्ट केलं.

You might also like