मुंबई । बॉलीवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीची पत्नी आलियाने नवाजकडे घटस्फोटाची मागणी केली आहे. यासाठी तिने कायदेशीर नोटीसही बजावली असल्याचे आलिया सिद्दीकीच्या वकिलांनी प्रसार माध्यमांना सांगितलं. आलियाचे वकील अभय सहाय यांनी नवभारत टाइम्स डॉट कॉमशी बोलताना हे स्पष्ट केलं. ‘आलियाने ७ मे रोजी एक कायदेशीर नोटीस अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीला पाठवली आहे. यात घटस्फोट आणि मेनटेनन्सची मागणी केली आहे.’
‘सध्या घटस्फोटाच्या नोटीसमध्ये जे मुद्दे मांडण्यात आले आहेत त्याबाबत सध्या सांगू शकत नाही. तसेच नोटीसमध्ये लिहिलेल्या अनेक गोष्टी अत्यंत संवेदनशील आहेत. लॉकडाउनमुळे स्पीड पोस्टची सुविधा उपलब्ध नसल्यानं आम्ही ही नोटीस ७ मे रोजी ईमेल आणि व्हॉट्सअपमार्फत पाठवली आहे. आलिया यांनी १३ मे रोजी नवाजुद्दीन यांना कायदेशीर नोटीस पाठवली होती. आतापर्यंत नवाजुद्दीन यांचं कोणतंही उत्तर आलेलं नाही.’
नवाज यांच्या पत्नी आलिया यांनी नवभारत टाइम्स डॉट कॉमशी याबाबत बोलताना सांगितलं की, ‘याक्षणी मी तुम्हाला फार काही सांगू शकत नाही. पण माझ्या वकिलांनी जे काही सांगितलं ते सर्व खरं आहे. अशा पद्धतीच्या गोष्टी आयुष्यात होतात तेव्हा त्यामागे काही कारणं असतात. मला वाटतं लॉकडाउनमध्ये मला आमच्या नात्याबद्दल विचार करायला वेळ मिळाला. अखेर विचार केल्यानंतरच मी घटस्फोटाचा निर्णय घेतला आहे. नवाज आणि माझ्या नात्यात अनेक दिवसांपासून प्रॉब्लेम होते. अनेक वर्षांपासून आम्ही वेगळेच रहात आहोत.’ असं आलीया यांनी सांगितलं.