देव आणि स्वर्ग आहे की नाही ते माहित नाही, परंतु लतादीदींमध्ये अनेकांनी देव पाहिला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचे आज वयाच्या 93 व्या वर्षी निधन झाले. त्यानंतर संपूर्ण देशभरातून त्यांना आदरांजली वाहिली जात आहे. दरम्यान, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील लता मंगेशकर यांच्या निधनानंतर दुःख व्यक्त केले. आपल्या हजारो सूमधुर गाण्यांनी कोट्यवधी रसिकांच्या हृदयसिंहासनावर आठ दशकांहून अधिक काळ अधिराज्य करणाऱ्या स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर हे भारतीयंच नव्हे तर, जागतिक संगीत विश्वाला पडलेलं अद्भूत स्वप्न होतं. लतादीदींच्या निधनानं ते स्वप्न आज भंगलं आहे असे त्यांनी म्हंटल.

लतादीदींच्या सुरेल सूरांनी रसिकांचं भावविश्व आणि देशाचं कलाक्षेत्र समृद्ध केलं. त्यांच्या जाण्यानं महाराष्ट्रातला, देशातला प्रत्येक जण, प्रत्येक घर आज शोकाकूल आहे. स्वर्गीय आनंद देणारी लतादीदींची गाणी, त्यांचे दैवी सूर हे आकाशात सूर्य-चंद्र असेपर्यंत राहतील, परंतु लतादीदी आपल्यात नसतील, ही कल्पना सहन होत नाही. लतादीदी जगात एकमेव होत्या. त्यांच्यासारखी गानकोकीळा पुन्हा होणे नाही… अशा लतादीदी आता पुन्हा होणे नाही…” अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गानकोकीळा, भारतरत्न, महाराष्ट्रभूषण लता मंगशेकर यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त करुन त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.

“लतादीदी अमर आहेत. त्यांना श्रद्धांजली वाहण्याची वेळ कधीच येणार नाही हा भाबडा समज आज खोटा ठरला आहे,” असं सांगत उपमुख्यमंत्री अजित पवार पुढे म्हणाले की, महाराष्ट्राच्या मातीला संगीतकलेचा गौरवशाली वारसा आहे. महाराष्ट्राच्या मातीत अनेक दिग्गज गायक, संगीतकार जन्मले. परंतु पंडित दिनानाथ मंगेशकरांच्या पोटी जन्मलेल्या लतादीदींनी भारतीय संगीत क्षेत्रात चमत्कार घडवला.

अठ्ठावीस सूरांच्या दुनियेत लीलया संचार करणाऱ्या लतादीदींनी आठ दशकांच्या प्रदीर्घ कारकिर्दीत एकापेक्षा एक सरस गाणी दिली. संगीतक्षेत्रात सर्वोच्च स्थान मिळवलं. ‘अद्वितीय’ अशी स्वतंत्र ओळख निर्माण केली. भारतीय, जागतिक संगीतक्षेत्र समृद्ध केलं. देव आणि स्वर्ग आहेत की नाही ते माहित नाही, परंतु लतादीदींमध्ये अनेकांनी देव पाहिला असेही त्यांनी म्हंटल.

लतादीदींचं नसणं कायम सलत राहील, मात्र त्यांची गाणी आपल्याला सदैव त्यांची आठवण देत राहतील. मी लतादीदींना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. या दु:खद प्रसंगात मी आणि संपूर्ण महाराष्ट्र मंगेशकर कुटुंबियांसोबत आहे. आम्ही सर्वजण त्यांच्या दु:खात सहभागी आहोत, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या शोकभावना व्यक्त करत लतादीदींना श्रद्धांजली वाहिली आहे.

Leave a Comment