निलंबित खासदारांना पाठिंबा म्हणून शरद पवारांनी केला अन्नत्याग

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । कृषी विधेयकाला आक्रमकपणे विरोध केल्याबद्दल निलंबित करण्यात आलेल्या राज्यसभेच्या आठ खासदारांना पाठिंबा म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज एक दिवस अन्नत्याग आंदोलन करणार असल्याची घोषणा केली आहे. मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत शरद पवार यांनीही निलंबित खासदारांना पाठिंबा दर्शवला. तसंच, आपण स्वत:ही आज दिवसभर उपोषण करणार असल्याचं शरद पवार यांनी जाहीर केलं. ‘सरकारला लवकरात लवकर हे विधेयक मंजूर करून घ्यायचं होतं. मात्र, सभागृहातील अनेक सदस्यांना विधेयकाबाबत प्रश्न होते. मात्र, सरकारला चर्चा नको होती असं प्रथमदर्शनी दिसत होतं,’ असं शरद पवार म्हणाले.

सदस्यांनी अन्नत्याग केला असून मीदेखील त्यांच्यात सहभागी होत आज दिवसभर अन्नत्याग करणार असल्याचं शरद पवार यांनी म्हटलं आहे. “सभागृहात दोन ते तीन दिवस चर्चा होण्याची अपेक्षा असते. पण ही विधेयकं तातडीने मंजूर करावी असा सत्ताधारी पक्षाचा आग्रह होता असं दिसत आहे. सदनाचं काम रेटून पुढे नेण्याचा प्रयत्न असावा असं दिसत होतं,” अशी टीका शरद पवार यांनी केली.

“हे नियमाविरोधात असल्याचं काही जण सभापतींना सांगत होते. सदस्यांनी वेलमध्ये धाव घेतली, नियमाचं पुस्तक वारंवार दाखवूनही दुर्लक्ष करण्यात आल्याने ते फाडण्याचा प्रकार घडला. नियमाचा आधार सदस्य घेत असतील तर किमान ते ऐकून घेण्याची अपेक्षा उपसभापतींकडून होती. पण त्याकडे लक्ष न देता मतदान घेण्यात आलं. तेदेखली आवाजी मतदानाने. साहजिक सदस्यांची प्रतिक्रिया तीव्र होती. या सगळ्या प्रश्ंनांकडे गांभीर्याने पाहणे, सदस्यांकडे लक्ष देणं अशी माझी अपेक्षा होती,” असं शरद पवार यांनी सांगितलं.

आदर्श विचारांना तिलांजली देण्याचं काम उपसभापतींनी केलं असल्याचं शरद पवारांनी यावेळी म्हटलं. उपसभापतींचं वर्तन सदनाच्या प्रतिष्ठा आणि पदाचं अवमूल्यन करणारी होती असंही ते म्हणाले आहेत. “एकीकडे बाजारपेठ खुली केली, मग कांद्यावर निर्यातबंदी का?,” असा सवाल शरद पवारांनी यावेळी केंद्र सरकारला विचारला. इतक्या घाईत दोन्ही विधेयकं एकत्र संमत करण्याची गरज नव्हती असं मत शरद पवारांनी व्यक्त केलं असून केंद्राच्या कृषी धोरणात विरोधाभास असल्याची टीका केली.

केंद्र सरकारनं आणलेल्या कृषी विधेयकांना राज्यसभेत जोरदार विरोध झाला होता. यावेळी गदारोळ करणाऱ्या आठ खासदारांना निलंबित करण्यात आलं आहे. त्यामुळं काँग्रेससह सर्वच विरोधी पक्ष आक्रमक झाले आहेत. खासदारांचे निलंबन मागे न घेतल्यास उर्वरित कामकाजावर बहिष्कार घालण्याचा इशारा काँग्रेसनं दिला आहे. यापुढं जाऊन निलंबित खासदारांनी संसद भवनाच्या आवारातील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर आंदोलन सुरू केलं आहे. राज्यसभेचे उपसभापती हरिवंश नारायण सिंह हेही आंदोलनात सहभागी झाले आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Leave a Comment