हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजप मधून राष्ट्रवादीत आलेल्या एकनाथ खडसे यांनी पुन्हा एकदा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. देवेंद्र फडणवीस हे सत्ता गेल्यापासून अस्वस्थ आहेत. सत्ता स्थापन करण्यासाठी ते आजही तळमळत आहेत, अशा शब्दांत खडसेंनी फडणवीसांना टोला लगावला आहे.
खरं सांगायचं तर राज्यातील आघाडी सरकार दिवसे न् दिवस मजबूत होत आहे. भाजपधील आमदारांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. नाराजांची संख्या वाढू नये म्हणून आपलं सरकार येणार असं आमदारांना सांगून वेळ मारून नेली जात आहे, असा दावाही त्यांनी केला.
खडसे म्हणाले, भाजप आमदारांमध्ये किती अस्वस्थता आहे हे मला माहिती आहे. कारण मीच त्यातील अनेकांना प्रवेश तसंच तिकिट दिलं होतं. माझ्याशी ते मोकळेपणाने बोलतात. जी कार्यपद्धती आहे त्याबद्दल नाराजी जाहीर करतात. असे लोक पक्षाबाहेर जाऊ नये किंवा नाराजांची संख्या वाढू नये त्यासाठी कदाचित अशी वक्तव्यं केली जात असतील.
अजितदादांसोबत सत्ता स्थापन करणे ही चूक होती असं फडणवीस यांनी म्हटलं आहे. त्यावरूनही खडसेंनी त्यांच्यावर टीका केली. फडणवीस अस्वस्थ आहेत. कोणत्याही कारणाने सत्तेत आलं पाहिजे म्हणून त्यांनी अजितदादांसोबत सरकार स्थापन केलं. आता त्यांनी चूक मान्य केली आहे. पण चूक मान्य केल्यानंतरही अजूनही असा प्रसंग आला किंवा एखाद्या पक्षाने त्यांना ऑफर दिली तरी ते सत्ता स्थापन करतील, असा टोला त्यांनी लगावला.
ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.