अनिल देशमुखांवर ‘ईडी’ची कारवाई; प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणतात….

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शंभर कोटींच्या कथिक वसुली प्रकरणी माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांच्या निवासस्थानी ईडीने छापेमारी सुरू केल्यानंतर राज्यात राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापलं आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. भाजप कडूनकेंद्रीय यंत्रणांचा वापर केला जात असल्याचा आरोप जयंत पाटील यांनी केला.

जयंत पाटील म्हणाले, अनिल देशमुख यांच्या सीबीआय चौकशीत काही सापडत नाही म्हणून त्यांचे आर्थिक व्यवहार तपासले जात आहे. १० वर्षांपूर्वीचं प्रकरणं बाहेर काढून त्यावरुन एफआयआर दाखल करायचा आणि छापेमारी करायची याचाच अनुभव सर्वांना येत आहे. मोठे आकडे टाकून भ्रष्टाचाराचे आरोप करायचे ही पध्दत असून केंद्रीय यंत्रणांचा वापर केला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

ईडीची कारवाई राजकीय सूडापोटी – सुप्रिया सुळे

यंत्रणेचा गैरवापर हे भाजपाचं स्टाईल ऑफ ऑपरेशन दिसत आहे अशा शब्दांत राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजपवर निशाणा साधला. केंद्रिय यंत्रणांचा चुकीच्या पद्धतीनं वापर केला जात आहे. ईडीची कारवाई राजकीय सूडापोटी केली जाते हे स्पष्ट दिसतंय. तसेच ईडीची कारवाई आणीबाणीची आठवण करुन देणारी असल्याचं सुप्रिया सुळेंनी म्हटलंय.