धनंजय मुंडेंनी कोरोनाला हरवलं; आज रुग्णालयातून सुट्टी मिळणार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री धनंजय मुंडे यांनी कोरोनाला हरवलं आहे. धनंजय मुंडे आता कोरोना मुक्त झाले आहेत. मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयातून त्यांना आज सुट्टी मिळणार आहे. १२ जूनला धनजंय मुंडे कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले होते. त्यांना श्वास घेताना त्रास जाणवत होता. त्यामुळे धनंजय मुंडे यांना तातडीने ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

धनंजय मुंडे हे काही दिवसांपूर्वीच बीडहून मुंबईत परतले होते. ते आणि त्यांच्या कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी नियमितपणे मंत्रालयात जात होते. यादरम्यान धनंजय मुंडे यांना कोरोनाची लागण झाल्याचा संशय आहे. यानंतर त्यांच्यासोबत असणाऱ्या कर्मचाऱ्यांचीही कोरोना टेस्ट करण्यात आली होती. त्यात धनंजय मुंडे यांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले होते.

गेल्या ११ दिवसांपासून धनंजय मुंडे यांच्यावर उपचार सुरु होते. अखेर त्यांनी कोरोनावर मात केली असून आज ते आपल्या घरी परततील. धनंजय मुंडे हे कोरोनावर मात करणारे महाविकासआघाडी सरकारमधील तिसरे मंत्री आहेत. यापूर्वी जितेंद्र आव्हाड आणि अशोक चव्हाण यांना लागण झाली होती. या दोन्ही नेत्यांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली होती.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”