आम्ही’पुन्हा प्रयत्न करू’ असे अनेकांना वाटत होते पण आता.. जयंत पाटलांचा फडणवीसांना टोला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । देशासह संपूर्ण जग कोरोनाविरोधात लढा देत असताना काहीजण राज्यात अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न करत होते. लोकशाहीच्या तथाकथित गळचेपीबाबत अनेकांनी राज्यपालांना पत्र लिहिली. तर काहींनी देव पाण्यात ठेवले होते. सरकार अस्थिर होईल आणि आम्ही ‘पुन्हा प्रयत्न करू’ असे अनेकांना वाटत होते, पण अशांच्या हाती अपयश आले आहे, असा चिमटा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना नाव न घेता काढला.

राज्यातील विधान परिषदेच्या ९ रिक्त जागांसाठी निवडणूक आयोगाने निवडणुका जाहीर केल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर माध्यमांशी संवाद साधताना जयंत पाटील यांनी ही प्रतिक्रिया दिली. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आयोगाला पत्र लिहून विधान परिषदेच्या निवडणुका घेण्याची विनंती केली होती. निवडणूक आयोगाने निर्णय घेतल्यामुळे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विधान परिषदेवर निवडून जातील आणि तेच राज्याचे मुख्यमंत्री राहतील, असा ठाम विश्वासही जयंत पाटील यांनी व्यक्त केला.

विधान परिषदेतील राज्यपाल नियुक्त २ रिक्त जागांपैकी एका जागेवर उध्दव ठाकरे यांची नियुक्ती करण्याची शिफारस राज्याच्या मंत्रिमंडळाने २ वेळा राज्यपाल भगतसिह कोश्यारींकडे केली. मात्र त्याबाबत काहीही निर्णय झाला नाही. म्हणूनच या ९ जागांसाठी निवडणूक लवकर घेण्यात यावी अशी विनंती महाविकास आघाडीने निवडणूक आयोगाकडे केली होती. दरम्यान, राज्यात कोरोनाचं संकट असताना काही लोक राज्यात अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न करत होते. मात्र निवडणूक आयोगाच्या आजच्या निर्णयामुळे राज्य सरकार अस्थिर करू पाहणाऱ्यांच्या हाती अपयश आलं आहे, असा टोलाही पाटील यांनी भाजपाच्या नेत्यांना लगावला आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.

Leave a Comment