‘भुजबळ साहेबांनी धीर दिला म्हणून, मी व्हीलचेअरवर असतानाही अर्थसंकल्प मांडू शकलो’; जयंत पाटलांचा आठवणींना उजाळा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी पक्षातील दिग्गज नेते आणि मंत्रिमंडळातील सहकारी छगन भुजबळ यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. जयंत पाटलांनी आपल्याला झालेल्या अपघातावेळी भुजबळांनी केलेली मदत यानिमित्ताने सांगितली. छगन भुजबळांनी दिलेल्या प्रोत्साहनामुळे मी अर्थसंकल्प तयार केला, व्हीलचेअरवर बसून सभागृहात मांडलाही, अशा भावना जयंत पाटील यांनी व्यक्त केल्या. ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर करत त्यांनी ही अनोखी आठवण सांगितली आहे.

“माझ्या अपघाताचा प्रसंग आठवतो. बंगळुरुला मी हॉस्पिटलमध्ये होतो. माझे दोन्ही पाय फ्रॅक्चर झाले होते. माझं ऑपरेशन होणार होतं. भुजबळ साहेब सर्वात आधी धावून आले. त्यांनी मला दिलासा दिला. धीर दिला. महिन्याभरात बजेट मांडायचं होतं. ते म्हणाले ‘जयंत, अर्थसंकल्प तुम्हालाच मांडायचा आहे, त्याशिवाय तरणोपाय नाही’ त्यांनी मला आणि कुटुंबीयांना धीर दिला. त्यांचे हे शब्द मला ऊर्जा देऊन गेले. त्यांनी दिलेला मदतीचा हात आणि प्रोत्साहनामुळे मला झालेला अपघात किरकोळ वाटू लागला. मला उभारी मिळाली. मी अर्थसंकल्प तयार केला, व्हीलचेअरवर बसून सभागृहात मांडलाही. संकटाच्या वेळी धीर देणारे नेते आहेत.” अशा भावना जयंत पाटील यांनी व्यक्त केल्या.

https://twitter.com/Jayant_R_Patil/status/1316605820801490946?s=20

“संघर्ष हा कुणालाच चुकला नाही. भुजबळ साहेबही त्यापैकी एक. महाराष्ट्रात फुले, शाहू, आंबेडकरांचे विचार जनमनात रुजवताना भुजबळ साहेबांना मोठ्या संघर्षातून जावे लागले. भुजबळ साहेबांना महाराष्ट्राच्या राजकारणातील एक संघर्षयात्री म्हटले तर वावगं ठरणार नाही. माणसाने संघर्षाला सामोरे कसं जावे हे शिकवणाऱ्या भुजबळ साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!” असे ट्विट जयंत पाटलांनी केले आहे. (Jayant Patil shares memory on Chhagan Bhujbal’s Birthday)

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”