‘अब की बार ट्रम्प सरकार’ बोंबलत होता? तेव्हा ती अमेरिकेच्या अंतर्गत प्रश्नात ढवळाढवळ नव्हती का?- आव्हाड

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । दिल्लीतील शेतकरी आंदोलनाबद्दल चिंता व्यक्त करणाऱ्या पॉपस्टार रिहानाचं कौतुक करत गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी भाजप नेते व भारतातील काही सेलिब्रिटींवर तोफ डागली आहे. नुकतंच अमिरिकेची पॉपस्टार रियाना हिनं याबद्दल एक ट्वीट केलं होतं. भाजपसह देशातील बॉलीवूड सेलिब्रिटी आणि क्रिकेटपटूंनीही विदेशींनी भारतात ढवळाढवळ करू नये, असं म्हणत रिहाना अप्रचार करत असल्याच्या सरकारच्या सुरत सूर मिसळला आहे.

यावर राष्ट्रवादीच्या जितेंद्र आव्हाडांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून त्यांचा खरपूस समाचार घेतला आहे. ‘अब की बार ट्रम्प सरकार’ असं बोंबलत अमेरिकेत का गेला होतात? ती अमेरिकेच्या अंतर्गत गोष्टीत ढवळाढवळ नव्हती का? अशा प्रतिक्रिया सोशल मीडियातून उमटत असून या स्वाभाविक प्रतिक्रिया असल्याचं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे.

‘गरिबीतून पुढं आलेल्या रियानाला दीनदुबळ्या घटकांबद्दल अजूनही आस्था आहे. पैसा व प्रसिद्धीमुळं ती संपलेली नाही. शेतकऱ्यांच्या आंदोलनाबद्दल आवाज उठवून तिनं ते दाखवून दिलं आहे. तिची ही भूमिका तोंडात मिठाची गुळणी धरून बसलेल्या तमाम सेलिब्रिटींच्या तोंडात मारणारी आहे,’ असं आव्हाड यांनी म्हटलं आहे.

रियानाच्या ट्वीटमुळं भक्तांची गोची झाली आहे. रियानाला देशद्रोही आणि नक्षलवादीही ठरवता येत नाही. पाकिस्तानात जा असंही सांगता येत नाही, अशी त्यांची अडचण झाल्याचं आव्हाड यांनी म्हटलं आहे. ‘आमच्या अंतर्गत बाबींत ढवळाढवळ करू नकोस असं म्हणणाऱ्यांनाही आव्हाड यांनी सुनावलं आहे. ‘अबकी बार ट्रम्प सरकार’ असं बोंबलत आपले नेते तिथं कशासाठी गेले होते? ती अमेरिकेच्या अंतर्गत प्रश्नात ढवळाढवळ नव्हती का?,’ असा सवाल आव्हाड यांनी केला आहे.

दरम्यान, केंद्रातील मोदी सरकारच्या कृषी कायद्यांच्या विरोधात हजारो शेतकरी गेल्या ७० हून अधिक दिवसांपासून आंदोलनाला बसले आहेत. युनोनंही या आंदोलनाची दखल घेतली आहे. नुकतंच अमिरिकेची पॉपस्टार रियाना हिनं याबद्दल एक ट्वीट केलं होतं. आपण यावर का बोलत नाही, असा प्रश्न तिनं केला होता. त्यावरून भारतातील काही सेलिब्रिटींना जाग येत त्यांनी तिला भारताच्या अंतर्गत बाबींमध्ये ढवळाढवळ न करण्याचा सल्ला दिला. मात्र, शेतकरी आंदोलनावर त्यांनी चकार शब्दही काढला नाही.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’.

Leave a Comment