Wednesday, June 7, 2023

नुसत्या जाहिराती करून कोरोना संपणार नाही; नवाब मलिकांचा केंद्रावर हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी पुन्हा एकदा वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रातील मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. कोरोना परिस्थिती लक्षात घेता एक देश एक निती हा कार्यक्रम ठरवण्याची गरज असताना नुसत्या जाहिरातीच्या माध्यमातून कोरोना संपणार नाही, अशी टीका नवाब मलिक यांनी केली आहे.

केंद्रसरकारला कोरोना परिस्थिती हाताळता येत नाहीय याबाबत कुणाच्याही मनात शंका राहिलेली नाही. देशातील सात हायकोर्टाने वेगवेगळे आदेश दिले आहेत. सुप्रीम कोर्टानेही टास्कफोर्स निर्माण करण्याचा निर्णय घेतलाय. जी कामे केंद्रसरकारला करायची आहेत ती केंद्रसरकारकडून होत नसल्याने न्यायालयाच्या आदेशाने होत आहेत. याचा अर्थ सरकार जबाबदारी पार पाडण्यात कमी पडतंय असा आरोपही नवाब मलिक यांनी केला आहे.

ते पुढे म्हणाले, कोरोना रोखणं हे एकट्या मोदींचं काम नाही, हे मी आधीपासून बोलतोय. सर्वपक्षीय बैठक बोलवा. जर सर्वजण कामाला लागले तर आठ महिन्यात कोरोनावर नियंत्रण मिळविता येईल. आता ज्या पद्धतीने काम सुरू आहे. विशेषत: भाजप शासित राज्यात. ते पाहता येत्या दोन चार वर्षात तरी कोरोना संपणार नाही, अशी टीकाही त्यांनी केली.

ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.