लोकांनी भरलेल्या ‘टॅक्स’मधून केलं जाणारं लसीकरण म्हणजे उपकार नाही ; रोहित पवारांनी युजीसीला सुनावलं

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशातील 18 वर्षांवरील सर्वांच्या मोफत लसीकरणासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार’, असा उल्लेख असलेला फलक लावण्याचे निर्देश युजीसीने देशातील विद्यापीठे, महाविद्यालये आणि तंत्रशिक्षण संस्थांना दिल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी युजीसीला खडेबोल सुनावलं आहेत. आपल्या फायद्यासाठी शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्राला राजकारणात ओढणं चुकीचं आहे असे रोहित पवार म्हणाले.

लोकांनी भरलेल्या ‘टॅक्स’मधून केलं जाणारं लसीकरण म्हणजे उपकार नाही तर कोणत्याही सरकारचं कर्तव्य आहे. पण मोफत लसीकरणाबाबत पंतप्रधानांचे आभार मानणारे फलक लावण्याची @ugc_india ची सूचना आश्चर्यकारक आहे. कदाचित ही गोष्ट पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनाही माहीत नसेल असे ट्विट आमदार रोहित पवार यांनी केलं आहे.

पंतप्रधान मोदींना खूष करण्यासाठी शिक्षण विभागाच्या मंत्र्यांच्या सूचनेनुसार UGC ने हा निर्णय घेतला असावा. आपल्या फायद्यासाठी शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्राला राजकारणात ओढणं चुकीचं आहे. कोरोना आणि विद्यार्थी यांच्याबाबत तरी असं राजकारण करु नये असेही रोहित पवार यांनी म्हंटल.