Tuesday, June 6, 2023

या राज्यपालांवर न बोललेलंच बरं; शरद पवारांचा खोचक टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोशारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बाबत वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर सर्वच स्तरातून त्यांच्यावर टीका होत आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यपालांवर निशाणा साधला. महाराष्ट्राला कर्तृत्ववान राज्यपालांचा वारसा आहे, त्यामुळे या राज्यपालांवर न बोललेलंच बर असा टोला शरद पवार यांनी लगावला.

शरद पवार म्हणाले, हे राज्यपाल आल्यानंतर अनेक प्रकार घडले. महाराष्ट्रात यापूर्वी सी प्रकाश हे राज्यपाल होते. त्यावेळी मी कार्यकर्ता म्हणून काम करत होतो. त्यावेळी यशवंतराव चव्हाण मुख्यमंत्री होते. राज्याचे राज्यपाल सी प्रकाश यांचं त्यावेळी देशात आणि देशाबाहेर नावलौकिक होता. त्यांना मी राज्यपाल म्हणून पाहिलं आहे. त्याचबरोबर या राज्यात पी. सी. अलेक्झांडर यांच्यासारखा कर्तुत्ववान राज्यपाल मी स्वतः पाहिला आहे. अशा राज्यपालांमध्ये हल्लीच्या राज्यपालांचं नाव ऐकायला मिळतं यावर भाष्य न केलेलं बर.

यावेळी त्यांनी नवाब मलिक यांच्या कारवाई वरूनही भाष्य करत भाजपवर निशाणा साधला. लिक यांच्यावरील कारवाई ही राजकीय हेतूनेच केली आहे. असा आरोप पवारांनी केला. तसेच यापूर्वी नारायण राणेंना देखील अटक झाली होती, त्यावेळी त्यांचा राजीनामा का घेतला नाही? उद्या पंतप्रधान पुण्यात याबाबत खुलासा करतील अस म्हणत नारायण राणे आणि नवाब मलिकांनी वेगळा न्याय का? असा सवाल पवारांनी भाजपला केला आहे.