संकटकाळी लोकांच्या मदतीसाठी धावून जाणे हे माझे कर्तव्य -शरद पवार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | अतिवृष्टीमुळे राज्यावर आजपर्यंतचे सर्वात मोठे आर्थिक संकट ओढावले आहे. या आर्थिक संकटातून शेतकऱ्यांना बाहेर काढण्यासाठी राज्य सरकारने कर्ज काढून त्यांना मदत करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केली. आपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना याबाबत विनंती करणार आहोत असे पवार म्हणाले. संकटाच्या काळात लोकांच्या मदतीसाठी धावून जाणे हे माझे कर्तव्य आहे असेही ते म्हणाले.

उद्धव ठाकरे आमच्या सांगण्यावरूनच मुंबईत थांबलेत

संकटाच्या काळात एखाद्या व्यक्तीने एकाच ठिकाणी थांबून प्रशासकीय निर्णय घेणे गरजेचे आहेत. त्यामुळेच आम्हीच मुख्यमंत्री ठाकरे यांना विनंती केली की आम्ही फिल्डवर आहोत तुम्ही मुंबईत एका ठिकाणी बसा आणि निर्णय घ्या. सगळ्यांनीची फिल्डवर जायची आवश्यकता नसते तर काही जणांनी मुंबईत एका जागी बसून निर्णय घेण्याची गरज असते, अस म्हणत शरद पवारांनी उद्धव ठाकरेंची पाठराखण केली.

लोकांच्या मदतीसाठी धावून जाणे हे माझे कर्तव्य

राज्यात भूकंप, अतिवृष्टी किंवा अन्य कुठलंही संकट असो… अशा संकटात शरद पवारच घटनास्थळावर सर्वात आधी कसे पोहोचतात?, असा प्रश्न विचारताच शरद पवार यांनी मला गप्प बसवत नाही म्हणून मी येतो, असं मिश्किल उत्तर दिलं आणि पत्रकारांमध्ये एकच हशा पिकला… गेल्या 53 वर्षात लोकांनी मला एकदाही घरी बसवले नाही. त्यामुळे संकटाच्या काळात या लोकांच्या मदतीसाठी धावून जाणे हे माझे कर्तव्य असल्याचे शरद पवार यांनी सांगितले

परतीच्या पावसानं दिलेल्या तडाख्यामुळं उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं आहे. त्या पार्श्वभूमीवर शरद पवार कालपासून उस्मनाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. मात्र, मुख्यमंत्री घराबाहेर का पडत नाहीत? असा प्रश्न पवार यांना विचारण्यात आला. त्यावर बोलताना पवार यांनी ‘ज्यांच्या हातात प्रशासनाची जबाबदारी असते त्यांना अनेक निर्णय घ्यावे लागतात आणि हे निर्णय घेण्यासाठी त्यांना कार्यालयात थांबावं लागतं’, असं उत्तर देत वेळ मारुन नेली. कोरोना संकटाच्या काळात आम्हीच मुख्यमंत्र्यांना तुम्ही एकाच ठिकाणी बसा, आम्ही सर्वजण फिरु, अशी विनंती केल्याचंही पवारांनी सांगितलं. आम्ही सर्वांच्या आग्रहामुळेच मुख्यमंत्र्यांनी ही भूमिका स्वीकारल्याचं पवार म्हणाले. मात्र, अतिवृष्टीमुळं आलेलं संकट मोठं असल्यानं मुख्यमंत्रीही आज नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी येत असल्याचं पवार म्हणाले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment