शेतकरी देशाचा अन्नदाता, त्यांच्या सहनशिलतेचा तुम्ही अंत पाहू नका – शरद पवारांचा केंद्र सरकारला इशारा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | “शेतकरी देशाचा अन्नदाता आहे, या अन्नदात्याच्या सहनशिलतेचा तुम्ही अंत पाहू नका” असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्र सरकारला दिला आहे. मोदी सरकारच्या कृषी कायद्यावरून देशभरातील शेतकरी आक्रमक झाला असून केंद्र सरकार विरोधात शेतकऱ्यांनी आंदोलन पुकारलं आहे, त्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी शेतकरी आंदोलनावर आपलं मत व्यक्त केलं.

शरद पवार म्हणाले, शेतकऱ्यांच्या या सर्व ज्या मागण्या आहेत, त्याच्यामध्ये मुख्यत: तीन शेतकरी बिलाबाबत आहेत. या तिनही बिलांसंबंधी संसदेत जेव्हा ही बिलं आली, त्यावेळी सगळ्यांच्या वतीने सांगण्यात आलं की, घाईघाईने इतक्या महत्त्वाचे तीन कायदे चर्चा न करता मंजूर करणं, हे आज जरी तुम्हाला शक्य असलं, तरी उद्या तुम्हाला त्याची प्रतिक्रिया शेतकऱ्यांकडून निघाल्याशिवाय राहणार नाही, म्हणून तुम्ही घाई करु नका. पण सरकारने विरोधकांची सूचना ऐकली नाही आणि तिनही कायदे अक्षरश: 15 ते 20 मिनिटांत मंजूर करुन घेतले”, असं शरद पवारांनी सांगितलं.

“आज त्यासंबंधीची टोकाची मागणी शेतकऱ्यांनी केली. शेतकऱ्यांनी सांगितलं की, तुम्ही हा कायदा मागे घ्या आणि मग त्यावर आपण शहानिशा करु, चर्चा करु, पण सरकारने ही मागणी मान्य केली नाही. त्यामुळे हा संघर्ष आणखी काही दिवस चालेल, अशा प्रकारची चिन्ह सध्या दिसत आहेत त्यामुळे माझी भारत सरकारकडे आग्रहाची विनंती आहे की, शेतकरी देशाचा अन्नदाता आहे, या अन्नदात्याच्या सहनशिलतेचा तुम्ही अंत पाहू नका असेही शरद पवार म्हणाले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’