राष्ट्रवादी-शिवसेना आणि काँग्रेसची महाआघाडी हेच महाराष्ट्राचे राजकीय भविष्य- संजय राऊत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी-शिवसेना आणि काँग्रेसची महाआघाडी हेच महाराष्ट्राचे राजकीय भविष्य आहे असं म्हणत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सामनातील रोखठोक सदरातून भाजपला डिवचले आहे. तसेच आगामी काळात भाजप आणि शिवसेना एकत्र येतील या शक्यतेनाही त्यांनी पूर्णविराम दिला आहे.

उद्धव ठाकरे यांनी 23 जानेवारीस केलेल्या भाषणाचे पडसाद जोरदार उमटत आहेत. भारतीय जनता पक्षाबाबत ठाम भूमिका त्यांनी मांडली. त्यांच्या भाषणातून एक संदेश नक्की मिळाला तो म्हणजे, काँग्रेस-राष्ट्रवादी शिवसेनेची महाआघाडी हेच यापुढे महाराष्ट्राचे राजकीय भविष्य आहे व भारतीय जनता पक्षाशी ‘टेबलाखालून’ व्यवहार आणि बोलणी चालली आहेत, हे दोन पक्ष पुन्हा एकत्र येतील या गप्पांना पूर्णविराम मिळाला आहे. असे संजय राऊत यांनी म्हंटल.

23 जानेवारीच्या भाषणात श्री. उद्धव ठाकरे यांनी भारतीय जनता पक्षावर जोरदार हल्ला केला. भाजपच्या ढोंगाचे, नकली हिंदुत्वाचे इतके वाभाडे श्री. ठाकरे यांनी कधीच काढले नव्हते. भारतीय जनता पक्षाबरोबरच्या युतीत शिवसेनेची वाढ झाली नाही. युतीत आम्ही सडलो, असे विधान त्यांनी पुन्हा केले. यावरून दोन पक्षांत आता टोकाचे भांडण सुरू झाले. महाराष्ट्रात कोण कोणाच्या आधाराने आणि मदतीने वाढले याचे संदर्भ देण्यात येत आहेत. उद्धव ठाकरे यांच्या भाषणात जोर होता व त्यांच्या भाषणाने भाजपास मिरच्या झोंबल्या हे त्यामुळे नक्की झाले. श्री. देवेंद्र फडणवीसांपासून आशिष शेलार यांच्यापर्यंत सगळे नेते शिवसेनेवर तुटून पडले. असे संजय राऊत यांनी म्हंटल.