हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीचा निकाल आल्यानंतर मोठ्या प्रमाणात हिंसेला सुरवात झाली. तृणमूल काँग्रेस आणि भाजप यांच्यामध्ये ही हिंसा झाल्याचे बोलले जात आहे. यावर राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. जातीयवादी आणि वेगवेगळ्या मार्गाने हिंसा करणाऱ्या भाजपला सशस्र मिरवणूका घेण्याची का गरज पडते. सोबतच, भाजपने दंगलीचा कधीही निषेध केला नाही की शांतता प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न केलेले नाही. गुजरात , भिवंडी, वाई , मिरज , मालेगाव , इत्यादी देशातील विविध लहान मोठ्या दंगली व हिंसाचार कुणी घडवला हे अभ्यासकांना माहीत आहे. कधी धर्माच्या नावाने तर कधी जातीच्या नावाने हिंसाचार व दंगली जाळपोळ घडवण्यात कोण सूत्रधार होते? असा मोठा सवालही त्यांनी यावेळी विचारला आहे.
सोबतच, RSS व भाजपवर टीका करताना ते म्हणाले की, “दरवर्षी सशस्त्र मिरवणूका काढून कुणाला भीती दाखवली जाते? याचे चिंतन आरएसएस व अंधभक्तांनी कधी तरी करावे. निःशस्त्र असलेल्या गांधीजी , दाभोळकर ,कलबुर्गी, पानसरे यांच्यावर गोळ्या चालवल्या त्यातून तुम्ही कोणता संदेश दिला ? आजही पुन्हा पुन्हा हत्येचे जाहीरपणे समर्थन केले जाते. पण माणूस मारता येतो त्याचा विचार मारता येत नाही हे तुम्ही विसरलात. अलीकडच्या काही वर्षात निवडणूक म्हणजे युद्ध असे स्वरूप कुणी आणले. तसेच, आपण गोडसे समर्थक आहोत की गांधीजी समर्थक आहोत यावरूनच आपली प्रवृत्ती कळत असते”.
भाजप व बिगर भाजप पक्षांचे राजकीय मतभेद आहेत व राहतील पण मनभेद झाले की हिंसाचाराला सुरवात होते. आपली भाषा ,आपली मूळ प्रवृत्ती, आपले सामाजिक व राजकीय तत्व कोणती आहे यावर बरेच काही ठरत असते. व्यक्तिगत पातळीवर असो की सामाजिक पातळीवर असो आपण हिंसेचे समर्थन कदापि करता कामा नये कारण तीच आपली पेरणी असते जी भविष्यात उगवणार असते. हे मानवजातीला आणि लोकशाहीला घातक आहे. यावर वेळीच विचार व्हायला हवा अशी चिंता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी यावेळी व्यक्त केली.