आंदोलनात राजकीय गोष्टी होत असल्यामुळे त्याला राजकीय पद्धतीनेच उत्तर; जयंत पाटील यांची भाजपवर टीका

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबईसह राज्यभर एसटी कर्मचाऱ्यांच्यावतीने विविध मागण्या साठी आक्रमक पावित्रा घेत आंदोलन केले जात आहे. यावरून भाजप नेते आंदोलकांची भेट घेत राज्य सरकार आरोप करत आहेत. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी भाजप नेत्यांवर टीका केली आहे. ‘एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडविण्याची सरकारची पूर्ण इच्छा आहे. पण भाजपचे नेते आंदोलनात पुढे जाऊन बसत आहेत, दंगा करत आहेत. या सर्व राजकीय गोष्टी होत असल्यामुळे त्याला राजकीय पद्धतीनेच उत्तर दिले जात आहे, असे मंत्री पाटील यांनी म्हंटले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी एसटी महामंडळ कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात भाजपकडून केल्या जात असलेल्या राजकारणावरून भाजपवर निशाणा साधला. यावेळी ते म्हणाले की, “महाविकास आघाडी सरकारने एसटीच्या कर्मचाऱ्यांकडे दुजाभावाने कधीच पाहिले नाही. त्यांचे प्रश्न सोडविण्याची सरकारची पूर्ण इच्छा आहे. परिवहन मंत्री अनिल परब कर्मचाऱ्यांच्या संघटनांशी चर्चा करत आहेत. हे प्रश्न लवकर सुटावेत, हीच राज्यसरकारची भूमिका आहे.

मात्र, राज्यभर होत असलेल्या आंदोलनाचा भाजपकडून फायदा घेतला जात आहे. भाजपचे नेते आंदोलनात पुढे जाऊन बसत आहेत, दंगा करत आहेत, अर्वाच्च बोलत आहेत. आजपर्यंत सरकारी किंवा निमसरकारी कर्मचाऱ्यांची आंदोलने ही त्यांच्या संघटनांकडून व्हायची. कोणताही राजकीय पक्ष अशा संघटनांमध्ये पुढे जाऊन आंदोलन करत नाही. सर्व राजकीय पक्षांनी या मर्यादा पाळल्या होत्या. परंतु भाजप ऐनकेन प्रकारे सरकारच्या विरोधी वातावरण निर्माण करण्यासाठी कर्मचाऱ्यांची संघटना उत्सुक नाही दिसल्यावर स्वतःच पुढे येऊन आंदोलन करायला लागले आहेत, अशी टीकाही मंत्री पाटील यांनी केली आहे.

Leave a Comment