राष्ट्रवादीने एकेकाळी लाल दिवा दिलेले कथोरे आता भाजपमध्ये मागून पहिल्या रांगेत बसतात ; सुप्रिया सुळेंचा टोला

ठाणे | राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला जे नेते सोडून गेले ते का गेले हे मला अद्याप कळलेले नाही. राष्ट्रवादीने एकेकाळी लाल दिवा दिलेले किसन कथोरे आता भाजपच्या पहिल्या रांगेत बसतात मात्र मागून पहिल्या रांगेत बसतात असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी लगावला आहे. बदलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आयोजित कार्यकर्ता मेळावा त्या बोलत होत्या.

जे राष्ट्रवादीला सोडून गेले त्यांना फार मोठं काही मिळालं असंही नाही. कोणी मुख्यमंत्री झाले की कोणाला लाल दिवा मिळाला की कोणाला मान सन्मान मिळाला? किसन कथोरे यांना अजित पवार यांनी पाटबंधारे विभागाचे राज्यमंत्रीपद दिले होते. मात्र आता भाजपमध्ये गेल्यानंतर मागील सहा वर्षांत त्यांना कोणतेतरी पद मिळाले आहे काय असा सवाल सुळे यांनी केला.

दरम्यान, नाईक साहेब जेव्हा स्टेजवर बसायला गेले तेव्हा त्यांना कोणी बसायलाही जागा दिली नाही. त्यांची अवस्था पाहून माझ्या डोळ्यांत पाणी आले असंही सुळे म्हणाल्या.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’