कंगनाला दिलेला पद्मश्री पुरस्कार परत घ्या; राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्याचे थेट राष्ट्रपतींना पत्र

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे बॉलीवूड अभिनेत्री कंगना राणावत हिच्यावर नेहमी टीका केली जाते. आताही कंगनाने पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केले आहे. भारताला 1947 ला भीक मिळाली होती, खरं स्वातंत्र्य तर 2014 ला मिळालं, असे कंगना हिने म्हंटले आहे. त्यामुळे याविरोधात विविध स्थरातून कंगनावर पुन्हा टीका केली जात आहे. दरम्यान राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष अंबादास खैरे यांनी राष्ट्रपतींना पत्र लिहिले आहे. “कंगनाला दिलेला पद्मश्री पुरस्कार परत घ्या, अशी मागणी खैरे यांनी पत्राद्वारे केली आहे.

अंबादास खैरे यांनी राष्ट्रपतींना लिहिलेल्या पत्रात असे म्हटले आहे की, कंगना राणावत यांचा कला क्षेत्रात केलेल्या कामगिरीमुळे 8 नोव्हेंबर 2021 रोजी आपल्या हस्ते पद्मश्री पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. कला क्षेत्र वगळता कंगना या प्रत्येक क्षेत्रात नको त्या ठिकाणी आपले नाक खुपसून प्रसिद्धी झोकात राहण्याचा प्रयत्न करत असतात. मात्र, आता पद्मश्री पुरस्कार मिळाल्यानंतर कंगना यांचे पाय जमिनीवर नाहीत. सध्या त्या हवेत आहेत. त्यांनी प्रसार माध्यमांसमोर भारताचा अवमान केला आहे.

कंगना यांनी एका मुलाखतीत म्हंटले आहे की, ‘1947 चे स्वातंत्र्य भीक मागून मिळाले होते, खरे स्वातंत्र्य 2014 मध्ये मिळाले होते. त्यांच्या या वक्तव्यामुळे स्वातंत्र मिळविण्याकरिता महात्मा गांधी, भगतसिंग, चंद्रशेखर आझाद, सुभाषचंद्र बोस यांच्यासह आपल्या प्राणाची आहुती दिलेल्या सैनिकांचा अपमान झाला आहे. त्यामुळे कंगना राणावत यांनी केलेल्या निंदनीय वक्तव्याचा आपण गांभीर्याने विचार करावा. तसेच त्यांना देण्यात आलेला पद्मश्री पुरस्कार परत घ्यावा व त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी खैरे यांनी पत्राद्वारे केली आहे.

Leave a Comment