पुणे | नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट्स (एनसीपीए) आणि सिटी इंडियाने आज त्यांच्या बहुप्रतिक्षित सिटी-एनसीपीए आदी अनंत: इथून ते अनंतापर्यंत या भारतीय संगीत महोत्सवाच्या 8व्या पर्वाची घोषणा केली. विविध शहरांमध्ये रंगणारा हा महोत्सव 18 नोव्हेंबर रोजी पुण्यातून आपल्या प्रवासाला सुरुवात करेल. ख्यातनाम बासरीवादक हरिप्रसाद चौरसिया आणि त्यांचे ज्येष्ठ शिष्य रुपक कुलकर्णी यांच्या सुरांनी हा प्रवास सुरू होईल.हा कार्यक्रम रविवार,18 नोव्हेंबर 2018 रोजी अण्णाभाऊ साठे ऑडिटोरिअम येथे 6.30 वाजता होेणार आहे.
या मैफिलीत हरिप्रसाद चौरसिया आणि रुपक कुलकर्णी स्वतंत्रपणे आणि एकत्र शास्त्रीय आणि निमशास्त्रीय सुरावटी सादर करतील. तर, भवानी शंकर त्यांना पखवाज या मध्ययुगीन काळातील दोन्ही बाजूंनी वाजवता येणार्या ड्रमसारख्या वाद्यावर साथ देतील. तबल्यावर विजय घाटे आणि आदित्य कल्याणपूर असतील.
यावर्षी पुण्यात कार्यक्रम केल्यानंतर आदीअनंत मुंबई, चेन्नई आणि बेंगळुरु या तीन शहरांत जाईल. तीन महिने चालणारा हा महोत्सव वर्षभरातील एक बहुप्रतिक्षित महोत्सव आहे. देशातील काही प्राचीन संगीत प्रकारांच्या माध्यमांतून भारतीय संस्कृतीचा शोध घेण्याची, त्यात तल्लीन होण्याची संधी या महोत्सवात प्रेक्षकांना मिळणार आहे. या आठव्या पर्वात, सिटी-एनसीपीए आदीअनंत संगीत महोत्सवात झाकीर हुसेन, हरिप्रसाद चौरसिया, अमजद अली खान आणि सुधा रघुनाथन अशा शास्त्रीय संगीत विश्वातील काही आदरणीय व्यक्तींचा समावेश असणार आहे.
एनसीपीएचे अध्यक्ष खुशरू एन संतूक या महोत्सवाबद्दल म्हणाले, परफॉर्मिंग आर्ट्स जतन करणे, प्रोत्साहन देणे आणि तिचा प्रसार करणे या कामाला वाहून घेतलेले एक राष्ट्रीय केंद्र म्हणून विविध उपक्रमांच्या माध्यमातून ही पुराणकाळातील संस्थात्मक रचना जपण्याचा आम्हाला अभिमान वाटतो. आमचे मान्यवर भागीदार सिटीने महान भारतीय वारसा जपण्यात वर्षानूवर्षे दिलेल्या सहयोगाबद्दल आम्ही आभारी आहोत. खरे तर सिटी एनसीपीए म्युझिक फॉर स्कूलच्या माध्यमातून आम्ही लहान मुलांचा संगीत शिक्षणाचा अधिकार अबाधित ठेवू शकलो आणि युनेस्कोने स्थापलेल्या इंटरनॅशनल कौन्सिल फॉर म्युझिक (आयएमसी)ची सदस्य संस्था म्हणून आमचे कर्तव्य बजावू शकतो, याबद्दल आम्ही समाधानी आहोत.
सिटी इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमित झवेरी म्हणाले, आदीअनंत महोत्सवाचे आठवे पर्व सादर करताना आम्हाला आनंद होत आहे. देशभरातील प्राचीन गुरू-शिष्य परंपरेला प्रोत्साहन देणे आणि चालना देणे हा या महोत्सवाचा हेतू आहे. आम्हाला आशा आहे की तुमच्यापैकी अनेकजण या संधीचा लाभ घेत संगीत क्षेत्रातील दिग्गजांनी प्राचीन सुरावटींना दिलेल्या नव्या रुपाचा आस्वाद घेतील. सिटीसाठी हा उपक्रम अत्यंत अर्थपूर्ण असा आहे. कारण एनसीपीएसोबत असलेल्या आमच्या अत्यंत सखोल आणि दिर्घकालीन संबंधांचा तो एक भाग आहे. उद्योन्मुख कलाकारांना प्रशिक्षण देण्यापासून ते देशातील काही उत्तम प्रतिभावंतांना जोपासणे या कार्यात भारतीय सांस्कृतिक वारशाची सातत्यपूर्ण प्रगती आणि उत्क्रांतीमध्ये सहभागी होताना सिटीला अभिमान वाटतो.