सातारा प्रतिनिधी| शुभम बोडके
सातारा- पाथर्डी महामार्गाचे काम कोरेगाव शहरात रखडल्यामुळे वारंवार वाहतूक कोंडी होत आहे. प्रचंड प्रमाणात उडणाऱ्या धुळीमुळे नागरी आरोग्य धोक्यात आले आहे. पादचाऱ्यांची चालताना होत असलेल्या कसरतीच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आज येथील जुना मोटार स्टँडवर ‘रास्ता रोको’ आंदोलन करून प्रांताधिकारी, तहसीलदारांना निवेदन देऊन काम तातडीने पूर्णत्वास न्यावे अन्यथा आणखी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला.
जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष तेजस शिंदे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनामध्ये जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या अध्यक्षा संजना जगदाळे, शिवाजीराव महाडिक, प्रतिभा बर्गे, श्रीमंत स. सावंत झांजुर्णे, श्रीमंत नि. झांजुर्णे, अरुण माने, ॲड. प्रभाकर निवेदन बर्गे, संजय पिसाळ, डॉ. गणेश होळ, संजीवनी बर्गे, हेमंत बर्गे, मंदाकिनी बर्गे, संगीता बर्गे, माधुरी चव्हाण, अॅड. पांडुरंग भोसले, प्रतापराव निकम, नाना भिलारे, अजय कदम, किशोर बर्गे, सचिन बर्गे, अजित बर्गे, प्रीतम बर्गे, गणेश धनावडे, फरदीन मुजावर, सनी शिर्के, अमरसिंह बर्गे, नितीन लवंगारे, नवनाथ बर्गे, विवेक चव्हाण, वैभव जगदाळे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.
सकाळी 11 च्या सुमारास जुना मोटार स्टँडवर तेजस शिंदे हे कार्यकर्त्यांसह रस्त्यावर उतरले. त्यानंतर सातारा ते पंढरपूर रस्त्याचे काम झाले पाहिजे, पन्नास खोकी एकदम ओके, भ्रष्टाचारी सरकारचे करायचे काय? खाली मुंडी वर पाय आदी घोषणा देत ‘रास्ता रोको’ आंदोलन सुरू करण्यात आले. आंदोलन सुरू होताच दोन्ही बाजूने वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लावून रस्त्याची वाहतूक बंद पडली. बराच काळ घोषणाबाजी झाल्यावर पोलिस निरीक्षक नितीन सावंत यांनी आंदोलकांशी चर्चा करून त्यांना मागणीचे निवेदन देण्यासाठी तहसीलदार कचेरीकडे नेले. त्यानंतर सर्व कार्यकर्ते तहसील कचेरी, तेथून प्रांताधिकारी कार्यालयात गेले. दोन्ही ठिकाणी निवेदन देऊन रस्त्याचे काम तातडीने सुरू करण्याच्या मागणीचे निवेदन सादर केले. काम सुरू न झाल्यास पुन्हा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही दिला.