राष्ट्रवादीची परिवार संवाद यात्रा साताऱ्यात 17, 18 एप्रिलला : रामराजे निंबाळकर

सातारा | सातारा येथे 17 एप्रिलला होणाऱ्या राष्ट्रवादीच्या संवाद यात्रेत सर्वांनी सहभागी होऊन यात्रा यशस्वी करावी. कोल्हापूर येथे होणाऱ्या यात्रेच्या सांगता सभेस अध्यक्ष, खासदार शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, तसेच पक्षाचे सर्व नेतेमंडळी उपस्थित राहणार आहेत. सातारा जिल्ह्यातून 25 हजार कार्यकर्ते कोल्हापूरच्या सांगता सभेस उपस्थित राहतील, अशी माहिती विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी दिली.

राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाची संवाद यात्रा राज्यातील 255 विधानसभा मतदारसंघ व 35 जिल्ह्यात फिरून प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. आता 17 व 18 एप्रिल रोजी सातारा जिल्ह्यात संवाद यात्रा येणार असून त्याचे स्वागत पालकमंत्री बाळासाहेब पाटील हे करणार आहेत. यावेळी जिल्ह्यातील राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

सातारा येथे दि. 17 व 18 एप्रिल रोजी होणाऱ्या राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेच्या नियोजनाची बैठक राष्ट्रवादी भवन, सातारा येथे पार पडली. दि. 23 एप्रिल रोजी कोल्हापूर येथे होणाऱ्या सांगता समारोपाच्या नियोजनासाठी ही बैठक पार पडली. याप्रसंगी विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, पालकमंत्री बाळसाहेब पाटील, आ. शशिकांत शिंदे, आ. दिपक चव्हाण, आयटी सेलचे अध्यक्ष सारंग पाटील, उदय कबुले, प्रदीप विधाते, मंगेश धुमाळ, बाळासाहेब सोळस्कर, राजकुमार पाटील, तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सर्व सेलचे जिल्हाध्यक्ष, जिल्हा कार्यकारणीचे सदस्य, तालुकाध्यक्ष, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.