कराड प्रतिनिधी| सकलेन मुलाणी
सातारा जिल्ह्यातीस पाटण तालुक्यात 90 पैकी 64 ग्रामपंचायतीत बाळासाहेबांची शिवसेनेने मोठे यश मिळवले आहे. शंभूराज देसाई यांनी 69 टक्के यश मिळवत विरोधकांना चोख प्रत्युत्तर दिले आहे. यावरून ‘दूध का दूध आणि पाणी का पाणी’ झाले आहे. पश्चिम महाराष्ट्र म्हणजे राष्ट्रवादीचा बालेकिल्ला, लोक गड समजायचे. परंतु आता राष्ट्रवादीच्या गडाला मोठा सुरुंग लावलेला आहे, असा इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला आहे.
दाैलतनगर (ता. पाटण) येथे बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या सरपंच व सदस्यांच्या सत्कार कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ऑनलाइन हजेरी लावली. यावेळी ते बोलत होते. यावेळी उत्पादन शुल्क मंत्री व सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई, बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन यशराज देसाई, मोरणा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष रविराज देसाई, बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे सातारा जिल्हाप्रमुख जयवंतराव शेलार यांच्यासह पक्षाचे सर्व नवनिर्वाचित सरपंच, सदस्य आणि पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पाटण तालुक्यातील बाळासाहेबांची शिवसेना या गटाच्या विजयी 64 सरपंच व 426 ग्रामपंचायत सदस्यांशी मुख्यमंत्र्यांनी संवाद साधला.
बाळासाहेबांच्या शिवसेनेत राष्ट्रवादी काँग्रेस मोठ्या प्रमाणावर सहभागी
आपल्या बाळासाहेबांची शिवसेना या पक्षात उद्धव ठाकरे गटाचे कार्यकर्ते येतच आहेत. परंतु राष्ट्रवादी काँग्रेसही आता मोठ्या प्रमाणावर सहभागी होत आहे. आपले काम प्रामाणिक असल्याने सगळे पक्ष हे भाजप- बाळासाहेबांची शिवसेना युतीमध्ये सहभागी होत, असल्याचेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.