राष्ट्रवादीची युवती प्रमुख कार्यकर्ती निघाली गाडी चोर; ‘या’ अनोख्या पध्दतीने चोरायची गाड्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसची चंद्रपूर शहर युवती प्रमुख असलेल्या तरुणीला वाहन चोरीच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे. वैष्णवी देवतळे असं या अटक करण्यात आलेल्या तरुणीचं नाव असून आपल्या 2 साथीदारांसह खास शक्कल वापरून ही तरुणी मोपेड चोरी करत होती, अशी धक्कादायक बाब या तपासात स्पष्ट झाली आहे.

चंद्रपूर शहरात गेल्या अनेक दिवसांपासून दुचाकी चोरण्यासाठी या तिघांनी विशिष्ट प्रकारची मोडस ऑपरेंडी वापरली होती. वैष्णवी देवतळे नावाची ही युवती आणि तिचे दोन साथीदार गर्दीच्या ठिकाणी लॉक नसलेल्या मोपेड गाड्या हेरत असत. ही युवती अशा गाड्यांवर बसून दूरपर्यंत ती ढकलत नेस असे. त्यानंतर साथीदारांच्या मदतीने गाडी निर्जनस्थळी नेत असत.

निर्जनस्थळी पोहोचल्यानंतर मेकॅनिक साथीदाराच्या सहाय्याने गाडी सुरू केली जात होती. तिथून मोपेड आपल्या राहत्या ठिकाणी आणत होते. मोपेड चोरी केल्यानंतर तिची विक्री केली जात असल्याची माहिती पुढे आली आहे. एकूण 11 मोपेड वाहने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने टोळीकडून जप्त केली आहेत

चंद्रपूरच्या स्थानिक गुन्हे शाखेने केलेल्या या कारवाईत युवतीसह इतर दोन साथीदारांनी चोरलेली 11 वाहने जप्त करण्यात आली आहेत. पोलिसांनी सध्या या तिघांना कोठडीत ठेवले असून त्यांच्याकडून अन्य काही ठिकाणचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे

You might also like