NCTE : 10 वर्षांनंतर पुन्हा एक वर्षाचा बी.एड अभ्यासक्रम; सरकारने धोरणात केला मोठा बदल, जाणून घ्या

0
1
B. ed policy
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

NCTE : राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद (NCTE) ने जवळजवळ दशकभरानंतर बी.एड आणि एम.एड अभ्यासक्रमांचा कालावधी एक वर्षाचा करण्याचा निर्णय घेतला आहे. हा नवा बदल २०२६-२७ शैक्षणिक सत्रापासून लागू होणार आहे. मात्र, दोन वर्षांच्या बी.एड आणि एम.एड अभ्यासक्रमांमध्येही काही बदलांसह ते सुरू राहतील.

पूर्वीचा अभ्यासक्रम कसा होता? (NCTE)

एनसीटीईने २०१४ मध्ये बी.एड आणि एम.एड अभ्यासक्रमाचा कालावधी एक वर्षावरून दोन वर्षांपर्यंत वाढवला होता. त्या वेळेस, गुणवत्तापूर्ण शिक्षक तयार करण्यासाठी २० आठवड्यांची इंटर्नशिप सुरू करण्यात आली होती. यामुळे बी.एड अभ्यासक्रम अधिक प्रगत करण्यात आला होता.

आता नव्या निर्णयानुसार काय होणार? (NCTE)

एनसीटीईचे अध्यक्ष पंकज अरोरा यांनी स्पष्ट केले की, एक वर्षाचा बी.एड आणि एम.एड अभ्यासक्रम पुन्हा सुरू करण्यात येणार असला तरी दोन वर्षांचा अभ्यासक्रमही सुरू राहील.

एक वर्षाचा बी.एड अभ्यासक्रम: हा अभ्यासक्रम त्यांच्यासाठी असेल, ज्यांनी चार वर्षांचा पदवी किंवा पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण केला आहे.
दोन वर्षांचा बी.एड अभ्यासक्रम: तीन वर्षांचा पदवीधर अभ्यासक्रम पूर्ण केलेल्यांसाठी उपलब्ध राहील.
एम.एड अभ्यासक्रम: एक वर्षाचा एम.एड पूर्णवेळ असेल, तर शिक्षक किंवा शिक्षण प्रशासकांसाठी (NCTE) दोन वर्षांचा अर्धवेळ अभ्यासक्रम असेल.

नवा आयटीईपी कार्यक्रम

आयटीईपी (इंटिग्रेटेड टीचर एज्युकेशन प्रोग्राम) हा चार वर्षांचा अभ्यासक्रम २०२३-२४ मध्ये ५७ संस्थांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात आला आहे. हा कार्यक्रम १२ वी पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांसाठी आहे. २०२५-२६ पासून, आयटीईपी नियमित शिक्षक शिक्षण कार्यक्रम होईल, आणि इच्छुक संस्थांना हा अभ्यासक्रम चालवण्यासाठी परवानगी दिली जाईल. याशिवाय, योग, शारीरिक शिक्षण, संस्कृत शिक्षण, आणि कला शिक्षण यांसारखे विशेष आयटीईपी कार्यक्रमही सुरू करण्यात येणार आहेत.

तीन वर्षांचा एकात्मिक बी.एड-एम.एड कार्यक्रम

२०१४ च्या नियमावलीत या कार्यक्रमाचा उल्लेख होता, मात्र त्यावर अद्याप अंतिम निर्णय घेतलेला नाही. पंकज अरोरा यांनी सांगितले की, “उर्वरित कार्यक्रमांबाबत आम्ही लवकरच निर्णय घेऊ.”या बदलांमुळे शिक्षक शिक्षण प्रणालीत सकारात्मक सुधारणा होणार असून विद्यार्थ्यांना अधिक पर्याय उपलब्ध होतील.