कराड | पाटण तालुक्यातील धायटी गावच्या हद्दीत छोटा हत्ती व दुचाकीचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात एक जण जागीच ठार तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. यावेळी दुचाकीवरील बकरीही ठार झाली आहे. सदरचा अपघात शुक्रवारी सकाळी झाला असून चाफळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघातात दुचाकीवरील संजय तावरे (वय- 50, रा. तावरेवाडी- पाडळोशी ) हे जागीच ठार झाले.
घटनास्थळावरून व पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पाटण तालुक्यातील चाफळ भागातील धायटी गावच्या हद्दीत अनिल पवार हे स्वतःचा छोटा हत्ती टेम्पो (क्रमांक- MH- 11- AG- 5414) घेवून जात असताना समोरून येणाऱ्या दुचाकीची (क्रमांक- MH- 50-S- 4274) समोरासमोर धडक झाली. पाडळोशी कडून चाफळकडे निघालेल्या टेम्पोची आणि पाडळोशी कडे निघालेल्या दुचाकीची धायटी हद्दीत समोरासमोर भीषण धडक झाली.
या अपघातात एकजण ठार तर एक जण गंभीर जखमी झाले. यावेळी दुचाकीवर असणारी बकरीही अपघातात ठार झाली आहे. शुक्रवारी सकाळी साडेनऊच्या दरम्यान हा अपघात झाला. या अपघाताची माहिती मिळताच चाफळ पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. या घटनेची खबर मिळताच चाफळ पोलीस दुरक्षेत्राचे मनोहर सुर्वे व सिद्धनाथ शेडगे यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला.