Tuesday, June 6, 2023

हलगर्जीपणा ! सलाईनची दोन इंच सुई राहिली रुग्णाच्या हातात; तीन महिन्यांनी काढली बाहेर

औरंगाबाद | कोरोनावर उपचार घेत असताना उपचारासाठी तीन महिन्यांपूर्वी मेल्ट्रॉन रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णाला उपचार करताना सलाईन देण्यात आले होते. परंतु दोन इंच लांब अँजिओकॅथ सुई त्याच्या हातात राहिल्याची घटना उघडकीस आला आहे.

दावरवाडी पैठण येथील नितीन खाडे हे मेल्ट्रॉन रुग्णालयात 19 ते 27 एप्रिल दरम्यान कोरोनावर उपचार घेण्यासाठी दाखल झाले होते. उपचारावेळी, प्लास्टिक अँजिओकॅथ सुई त्याच्या उजव्या हातात राहिले. त्यामुळे त्यांनी डॉक्टरांना आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांना त्यांचा हात दुखत असल्याबद्दल सांगितले. परंतु त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. जेव्हा त्याला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला तेव्हा हातातील वेदना जास्तच वाढल्या. म्हणूनच, त्यांनी खाजगी रुग्णालयात जाऊन डॉक्‍टरांना दाखवले असता त्यांच्या हातात सुई असल्याचे आणि ही सुई काढण्यासाठी शस्त्रक्रिया करावी लागेल असेही त्यांनी सांगितले. सुई काढण्यासाठी चाळीस हजार रुपये खर्च येणार असल्यामुळे त्यांनी घाटी रुग्णालयात दाखल होण्याचा निर्णय घेतला.

31 जुलै रोजी शस्त्रक्रियेनंतर 2 इंचाची ही सुई काढण्यात आली. यानंतर सिडको एमआयडीसी पोलिस ठाण्यात नितीन खाडे यांच्याकडून तक्रार दाखल करण्यात आली आहे. यासंदर्भात तक्रार प्राप्त झाली आहे आणि चौकशी नंतर अहवाल सादर केला जाईल असे महापालिकेच्या वैद्यकीय अधिकारी डॉक्टर नीता पाडळकर यांनी सांगितले.