औरंगाबाद | सध्या पावसाळा सुरु झाला असून रस्तावरील खड्ड्यामध्ये पाणी साचते. ते पाणी घरात येऊ नये म्हणून दलाल वाडीतील औषधीभवन येथील नाल्यावरील पुलाची उंची वाढवण्या चे काम सुरू आहे. परंतु कंत्राटदाराने नाल्यातील कचरा न काढताच बांधकाम सुरू केले आहे. सध्या बांधकाम संथगतीने सुरू असून खासदार इम्तियाज जलील यांनी या ठिकाणी भेट दिली.
खासदार इम्तियाज जलील यांनी या ठिकाणी व्यापाऱ्यांच्या व्यथा ऐकून नालेसफाई न करता पुलाच्या बांधकामात हलगर्जीपणा, दिरंगाई अथवा काम निकृष्ट दर्जाचे केल्याप्रकरणी अधिकारी व ठेकेदारावर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. अजय चावरिया व रमेश पाटील यांनी पावसामुळे या भागात, नाल्यात भरपूर पाणी आणि कचरा पडून राहिल्यामुळे दुर्गंधी आणि डासांचा उच्छाद वाढतो. हे खासदार इम्तियाज जलील यांच्या पाहणी करताना लक्षात आणून दिले.
दलालवाडी भागात असलेल्या नाल्यामध्ये थर्माकोलचे तुकडे, औषधांचे बॉक्स, प्लास्टिक बॅग असा कचरा बऱ्याच वर्षापासून पडलेला आहे. पावसामुळे या भागात आणि नाल्यात भरपूर पाणी आणि कचरा पडून राहिल्यामुळे दुर्गंधी आणि डासांचा उच्छाद वाढतो. तसेच दरवर्षी पावसाळ्यात फकीरवाडी, चुनाभट्टी, दलालवाडी, न्यू गुलमंडी रोड या परिसरातील हजारो घरांमध्ये पाणी शिरून फजिती उडते. अनेक वर्षापासून ही समस्या दूर करणे गरजेचे होते. परंतु पस्तीस वर्षात एकदाही या नाल्याची पूर्णपणे स्वच्छता झालेली नाही. यामुळे दुर्गंधी आणि साथीचे रोग पसरण्याची शक्यता आहे. याबाबत खासदार इम्तियाज जलील यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना निविदा देऊन वेळेत संपूर्ण नालेसफाई करूनच तांत्रिक दृष्ट्या नियोजनबद्ध गुणवत्तापूर्ण व जलदगतीने पुलाचे बांधकाम पूर्ण करण्याच्या सूचना महापालिका आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांना केले आहेत.