सातारा । सातारा जिल्ह्याच्या राजकीय दृष्टीकोनातून महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकांचे निकाल जाहीर झाले आहेत. या निवडणुकीत सुरुवातीलाच 11 जागा बिनविरोध झाल्या. मात्र, काही जागांवर विरोध झाल्याने निवडणुकीत विजयासाठी अनेक दिग्गज नेते निवडणूकीच्या रिंगणात उतरले. या निवडणुकीत अकरा उमेदवार बिनविरोध झाले तर दहा उमेदवारांनी लढत देत विजय मिळविला. अखेर आता सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसाठी नूतन संचालक मंडळ तयार झाले आहे.
जिल्ह्यातील राजकीयदृष्ट्या महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या या जिल्हा बँकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत सहकार पॅनलने बाजी मारली असली तरी अनेक दिग्गजांना पराभवाचा सामना करावा लागला. मुख्य म्हणजे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार शशिकांत शिंदे यांचा जावळी विकास सोसायटी गटात झालेला पराभव राष्ट्रवादीसाठी धक्कादायक मानला जात आहे.
पाटण सोसायटी गटात शिवसेनेचे आमदार तथा गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते सत्यजित पाटणकर यांनी विजय मिळवला आहे. हा शिवसेनेसाठी धक्काच मानला जात आहे.
अशा झाल्या अटीतटीच्या लढती –
कराड सोसायटी गटाबाबत सांगायचे झाले तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाळासाहेब पाटील यांच्या विरोधात काँग्रेसचे दिवंगत नेते विलासराव पाटील उंडाळकर यांचे सुपुत्र उदयसिंह उंडाळकर यांनी निवडणुकीत दंड थोपटले होते. मात्र, त्यांना पराभव पत्करावा लागला आहे. या ठिकाणी भाजप नेते अतुल भोसले यांनी सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांना साथ दिली आहे. त्यामुळे आगामी राजकारणात राष्ट्रवादी- भाजप नवी युतीची नांदी ठरणार का? याकडे ही तालुक्याचे लक्ष लागले आहे.
माण सोसायटी गटाबाबत सांगायचे झाले तर या ठिकाणी शेखर गोरे याचा विजय झाला आहे. शेखर गोरे यांनी प्रतिस्पर्धी असलेल्या सत्ताधारी सहकार पॅनेलचे उमेदवार मनोज पोळ यांचा पराभव केला. दोन्ही उमेदवारांना प्रत्येकी 36 मते मिळाली होती. अखेर चिट्टी द्वारे शेखर गोरे हे विजयी झाले. विशेष म्हणजे शेखर गोरे यांना पराभूत करण्यासाठी त्यांचे स्वतःचे बंधू व भाजपचे आमदार जयकुमार गोरे यांनी राष्ट्रवादीशी हातमिळवणी केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
कोरेगाव सोसायटी गटातून सत्ताधारी सहकार पॅनेलचे शिवाजीराव महाडिक यांचा पराभव करीत सुनील खत्री यांचा विजय झाला आहे. कोरेगाव मतदार संघात दोन्ही उमेदवारांना 45- 45 मते मिळाली होती. अखेर चिठ्ठी काढून सुनील खत्री यांचे नाव निघाल्याने ते विजयी घोषित केले आहेत.
खटाव प्राथमिक कृषी पतपुरवठा मतदारसंघाट माजी आमदार प्रभाकर घार्गे यांनी कोणत्याही नेत्याचे पाठबळ नसताना स्वतःच्या ताकदीवर राष्ट्रवादीचा पराभव केला. घार्गे यांना 56 इतकी मते मिळाली आणि त्यांनी प्रतिस्पर्धी उमेदवार नंदकुमार मोरे यांचा 10 मतांनी पराभव केला आहे.
जावळी मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शशिकांत शिंदे यांच्या विरोधात ज्ञानदेव रांजणे यांनी अर्ज दाखल केला. त्यानंतर अखेर रांजणे हे विजयी झाले. तर राष्ट्रवादीचे विधान परिषद आमदार शशिकांत शिंदे यांना परभवाचा धक्का सहन करावा लागला.
जिल्हा बँकेचे नूतन संचालक मंडळ –
(बिनविरोध निवड झालेले सभासद)
श्री.रामराजे नाईक निंबाळकर, फलटण
श्री. शिवेंद्रराजे भोसले, सातारा
श्री.उदयनराजे भोसले, सातारा
श्री. मकरंद पाटील, वाई
श्री. नितिन पाटील, वाई
श्री. राजेंद्र राजपुरे, महाबळेश्वर
श्री. दत्तानाना ढमाळ, खंडाळा
श्री. अनिल देसाई, माण
श्री. शिवरूपराजे खर्डेकर, फलटण
श्री. लहूराज जाधव, कराड
श्री. सुरेश सावंत, सातारा
(निवडून आलेले उमेदवार)
श्री. ज्ञानदेव रांजणे, जावली
श्री. प्रभाकर घार्गे, खटाव
श्री.शेखर गोरे, माण
श्री. सत्यजित पाटणकर, पाटण
श्री. बाळासाहेब पाटील, कराड
श्री. सूनील खत्री, कोरेगाव
(इतर)
श्री. प्रदीप विधाते, खटाव
श्री. रामभाऊ लेंबे, कोरेगाव
सौ. कांचनताई साळुंखे, सातारा
सौ. ऋतुजा वाठारकर, कराड