सातारा प्रतिनिधी | महाबळेश्वर तालुक्यातील वाळणे येथे राहणाऱ्या मीना सुतार या महिलेची प्रसुती दिलेल्या तारखेआधीच काही दिवस झाली. बेल एअर हाॅस्पिटलच्या स्टाफमधील कर्मचाऱ्यांनी संबंधित बाळातीण आणि नवजात शिशु या दोघांनाही तापोळा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेलं आणि १ तासात पुन्हा आणून सोडलं. या प्रवासानंतर नवजात शिशुचा धक्कादायक पद्धतीने मृत्यु झाल्याची घटना समोर आली. याबाबात वाळणे ग्रामपंचायतीने महाबळेश्वर पंचायत समितीच्या बेल एअर हाॅस्पिटलच्या कर्मचाऱ्याच्या हलगर्जीपणाबाबत तक्रार केली आहे. याबाबत हॉस्पिटल प्रशासनावर कारवाई करण्याची मागणीही होत आहे.
वाळणे ग्रामपंचातीने केलेल्या तक्रारी मध्ये सदर महिलेची प्रसुती क्रिटिकल असल्याचा उल्लेख आहे. नवजात बालकाचे वजन २ किलो भरल्याने त्याला तात्काळ व्हेन्टीलेशनमध्ये ठेवणं गरजेचं होतं. या महत्त्वाच्या गोष्टीची नोंद न घेता फक्त प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रसुती झाली आहे हा उद्देश पूर्ण करण्याकरिता तापोळा प्राथमिक आरोग्य केंद्रात मीना सुतार यांना आणण्यात आले. यापुर्वी देखील सचिन मोरे यांच्या नवजात बालकाचा मृत्यु अशा हालगर्जीपणामुळे झाला आहे. शासनाच्या निर्देशानुसार जिल्हा परिषदेकडून दुर्गम आणि डोंगराळ भागाची आरोग्य सेवा खाजगी हॉस्पिटलकडे वर्ग केल्याने आरोग्य सेवा कोलमडली आहे. खाजगी रुग्णालयाकडून हलगर्जीपणा होत असेल तर त्यांच्याकडे सेवा देण्याचा घाट कशासाठी ही चर्चाही केली जात आहे.
वाळणे गाव सध्या कन्टेनमेंट झोनमध्ये आहे. अशा परिस्थितीत एखाद्या वेगळ्या आजाराची तातडीची केस आली तर स्थानिक आरोग्य यंत्रणा सजग असायला हवी होती. मात्र बेल एअरने कोणतीही उपाययोजना केलेली नसल्याचं या प्रकारानंतर समोर आलं आहे. आशा सेविका, सरपंच, अंगणवाडी सेविका काळजीपूर्वक आपली सेवा बजावत आहेत. मात्र एवढं असूनही अनेक वर्षांपासून आरोग्य सेवा पुरवण्यात अग्रणी असलेलं बेल एअर रुग्णालय दुर्गम व डोंगराळ प्रदेशात आरोग्य सेवा देण्यात अपयशी ठरलं अाहे.
येथील आरोग्य सेवा पुन्हा जिल्हा परिषदेकडे देण्यात यावी अशी मागणी आता वाळणे ग्रामस्थांनी केली आहे. महाबळेश्वर तालुक्यांतील कांदाटी खोऱ्यातील दुर्गम भागातील जनतेचा आरोग्य वनवास सुटावा आणि त्यांना उत्तम आरोग्य सेवा मिळावी म्हणून येथील नागरिकांनी आता विनवणी सुरु केली आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’