हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मशिदी वरील भोंगे न हटवल्यास त्यासमोर हनुमान चालीसा पठण केली जाईल अस विधान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केल्यानंतर राज्यात वातावरण तापलं आहे. राज ठाकरे यांच्या भूमिकेनंतर राज्यात धार्मिक तेढ निर्माण होण्याची शक्यता असून त्याच पार्श्वभूमीवर नाशिक शहरातील सर्व धार्मिक स्थळांनी आणि इतरांनीही येत्या 3 मे पर्यंत भोंगे लावण्यासाठी परवानगी घ्यावी. अन्यथा त्यांच्यावर कडक कारवाई करून हे भोंगे काढले जातील असे आदेश पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी दिले आहेत.
दीपक पांडे यांनी काढलेल्या आदेशानुसार, ज्यांना हनुमान चालीसा म्हणायची आहे त्यांनी 3 मे पर्यंत पोलीस आयुक्तांची परवानगी घ्यावी. अजान सुरू असताना मशिदीच्या 100 मीटर परिसरात हनुमान चालिसा पठण करण्यास मनाई आहे. यासाठी कोणतीही परवानगी मिळणार नाही. तसेच अजानच्या वेळेपूर्वी 15 मिनिटे आणि त्या काळात दुसऱ्यांना ध्वनिप्रदूषण करता येणार नाही.
आदेशांचं उल्लंघन करणाऱ्यांवर धडक कारवाई होणार आहे. कोणी ऐकणार नसेल, तर थेट कारवाई करू. त्यात 4 महिने ते 1 वर्षाचा तुरुंगवास होऊ शकतो. त्यात दंड वेगळा असेल. तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्यास तडीपारी होऊ शकते. 6 महिन्यांसाठी अटक करून तुरुंगात टाकू शकतो. त्यामुळे सर्वांनी नियमांचे पालन करून सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.
नाशिक पोलीस आयुक्तालयाने काढलेल्या आदेशानुसार, ध्वनीक्षेपकाबाबत सर्वोच्च न्यायलयाच्या आदेशाचे पालन करण्यात येणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आदेश आणि त्याअनुषंगाने राज्य सरकारचे आदेश यानुसार, आवाजाची पातळी ठरवण्यात आली आहे. या आवाजाची पातळी औद्योगिक, निवासी, व्यावसायिक, शांतता क्षेत्रासाठी निश्चित करण्यात आली आहे. त्यानुसार भोंगे असलेल्या प्रार्थनास्थळांना आवाजाची पातळी ठरवावी लागणार आहे.