Tuesday, January 7, 2025

भारतीय क्रिकेटचा कायापालट होणार; BCCI ची सर्वात मोठी घोषणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय क्रिकेटसाठी (Indian Cricket) एक महत्वाची आणि अभिमानाची बातमी आहे. देशात क्रिकेटला उपयुक्त अशा अनेक पायाभूत सुविधा असताना आता भारतीय क्रिकेट बोर्डाने (BCCI) आणखी एक मोठी घोषणा करत खेळाडूंना मोठं गिफ्ट दिले आहे. बेंगळुरूमध्ये नवीन राष्ट्रीय क्रिकेट अकादमी (NCA) चे अनावरण करण्यात येणार असल्याची माहिती बीसीसीआयचे सचिव जय शाह (Jay Shah) यांनी दिली आहे. पाऊस पडला तरी खेळाडू याठिकाणी सराव करू शकतील. या निर्णयामुळे भारतीय क्रिकेटची उन्नती होणार असून खेळाडूंना आधुनिक सुविधा मिळणार आहे.

BCCI ने फेब्रुवारी 2022 मध्ये बेंगळुरू विमानतळाजवळ एक नवीन NCA सुविधा बांधण्याची योजना आखली होती. आज दोन वर्षांनी ती तयार झालेली दिसते. जय शाह यांनी ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे. त्यांनी आपल्या पोस्ट मध्ये म्हंटल, बीसीसीआयची नवीन राष्ट्रीय क्रिकेट अकादमी (एनसीए) जवळजवळ पूर्ण झाली आहे आणि लवकरच बेंगळुरूमध्ये ती खुली करण्यात येईल हे जाहीर करताना खूप आनंद होत आहे. नवीन NCA मध्ये ३ जागतिक दर्जाचे खेळाचे मैदान, 45 सराव खेळपट्ट्या, इनडोअर क्रिकेट खेळपट्ट्या, एक ऑलिम्पिक आकाराचा जलतरण तलाव आणि अत्याधुनिक प्रशिक्षण, रिकवरी आणि क्रीडा विज्ञान सुविधा असतील. हा उपक्रम आपल्या देशातील वर्तमान आणि भविष्यातील क्रिकेटपटूंना शक्य तितक्या चांगल्या वातावरणात त्यांचे कौशल्य विकसित करण्यास मदत करेल! असा विश्वासही जय शाह यांनी व्यक्त केला.

सध्याचे एनसीए (NCA) अकेडमी सुद्धा बंगळुरूमध्येच असून 2000 मध्ये बीसीसीआयचे माजी अध्यक्ष राज सिंह डुंगरपूर यांच्या नेतृत्वाखाली बांधण्यात आली होती. माजी दिग्गज क्रिकेटपटू VVS लक्ष्मण हे या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे सध्याचे अध्यक्ष आहेत. टीम इंडियाचा कोणताही खेळाडू दुखापत झाल्यास तो बरा होण्यासाठी एनसीएकडे जातो.अत्याधुनिक सुविधा असल्याने या अकादमीचा भारतीय खेळाडूंना मोठा फायदा होत आहे. आता आणखी एक नवीन अकादमी स्थापन झाल्यानंतर याचा चांगला परिणाम क्रिकेटपटुंच्या भविष्यावर होणार असून भारतीय क्रिकेटचा आणखी कायापालट होण्यास मदत होणार आहे.