औरंगाबाद : कोरोना महामारीच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सरकारी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (घाटी) बालरुग्ण; त्याचबरोबर नवजात शिशुंसाठी आणखी 40 नवीन व्हेंटिलेटर उपलब्ध करण्यात येणार आहेत. विशेष म्हणजे जिल्हा शल्यचिकित्सकांमार्फत ही खरेदी होणार असून, यानंतर उपकरणे घाटीकडे देण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
‘घाटीमध्ये बालरुग्णांसाठी सध्या 20 स्वतंत्र व्हेंटिलेटर असून आणखी 40 नवीन व्हेंटिलेटर उपलब्ध होणार आहेत. यामध्ये 25 व्हेंटिलेटर बालरुग्णांसाठी, तर 15 व्हेंटिलेटर नवजात शिशुंसाठी असणार आहेत. 40 नवीन व्हेंटिलेटरची खरेदी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुंदर कुलकर्णी यांच्या मार्फत लवकरच होणार आहे. ही खरेदी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत होणार आहे. उपलब्ध झालेले व्हेंटिलेटर घाटी प्रशासनाकडे देण्यात येतील,’ असे डॉ. कुलकर्णी यांनी सांगितले.
त्यामुळे घाटीमध्ये बालरुग्ण व नवजात शिशुंसाठी एकूण 60 व्हेंटिलेटर उपलब्ध होतील आणि त्याचा गंभीर बालरुग्ण व नवजात शिशुंना लाभ होऊ शकेल. ही खरेदी प्रक्रिया लवकरच होण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे.