हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन New Railway Station In Thane । मागील काही वर्षांपासून भारतीय रेल्वेचा मोठा कायापालट झाला आहे. अनेक मार्गावर नवनवीन रेल्वे धावत आहेत, तर जिथे जिथे आवश्यक आहे त्या त्या ठिकाणी नवीन रेल्वे स्थानके उभारण्यात येत आहेत. आता आणखी एक रेल्वे स्थानक उभारणीच्या कामाला गती मिळाली असून ते रेल्वे स्थानक ठाणे जिल्ह्यात तयार होत आहे. ठाणे आणि मुलुंड दरम्यान प्रस्तावित असलेल्या नवीन उपनगरीय रेल्वे स्थानकाच्या रखडलेल्या प्रकल्पाला अखेर गती मिळाली असून खासदार नरेश म्हस्के यांनी याबाबत माहिती दिली आहे.
काय म्हणाले नरेश म्हस्के – New Railway Station In Thane
ठाणे आणि मुलुंड दरम्यान नवीन उपनगरीय रेल्वे स्थानक व्हावं, ही मागणी गेल्या अनेक वर्षांपासून नागरिकांकडून सातत्याने होत होती. रोज रेल्वेने प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांसाठी हे स्थानक अत्यंत महत्त्वाचं आहे. पण, मंजुरी मिळूनही विविध कारणांमुळे या प्रकल्पाचं काम रखडत राहिलं आणि त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी, अस्वस्थता आणि प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं. हा प्रश्न केवळ एका स्थानकाचा नव्हता, तर तो ठाणे–मुलुंड परिसरातील भविष्यातील विकासाचा, वाहतुकीच्या सोयीचा आणि सामान्य माणसाच्या वेळेचा प्रश्न होता. म्हणूनच या प्रकल्पासाठी मी आणि लोकसभेतील शिवसेनेचे गटनेते खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सुरुवातीपासूनच ठाम भूमिका घेतली. हा प्रकल्प पूर्ण व्हायलाच हवा, हा निर्धार मनाशी धरून आम्ही सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवला. या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला अखेर यश आलं. केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्वतः उपमुख्यमंत्री मा. श्री. एकनाथजी शिंदे साहेबांना फोनवरून याबाबत महत्त्वाची माहिती दिली आणि सर्व कामं तात्काळ सुरू केली जातील आणि त्याचा खर्च रेल्वे प्रशासन उचलणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं नरेश म्हस्के यांनी दिली. New Railway Station In Thane
या निर्णयामुळे आता नवीन उपनगरीय रेल्वे स्थानकाचं काम वेगाने पुढे जाईल. हा प्रश्न मार्गी लावल्याबद्दल मी आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांचे मनापासून आभार मानले. तसेच शिंदे साहेबांच्या सकारात्मक भूमिकेमुळेही हा निर्णय शक्य झाला याबद्दल त्यांचेही मनःपूर्वक आभार मानतो. ठाणे–मुलुंड दरम्यान तयार होणारं हे नवीन उपनगरीय रेल्वे स्थानक भविष्यातील विकासाचं प्रतीक ठरेल. यामुळे नागरिकांचा प्रवास अधिक सुलभ होईल, वेळ वाचेल आणि शहराच्या विकासाला नवी दिशा मिळेल असा विश्वास नरेश म्हस्के यांनी व्यक्त केला.
दरम्यान, हे नवीन रेल्वे स्थानक उभारल्यानंतर ठाणे आणि मुलुंड स्थानकांवरील प्रवासी भार मोठ्या प्रमाणात कमी होण्याची शक्यता आहे. प्रवाशांचा प्रवास अधिक सोप्प्पा होईल आणि गर्दीपासून त्यांची सुटका होईल. तसेच या परिसराच्या विकासाला नवीन दिशा मिळेल




