हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जे लोक म्युच्युअल फंडात SIP च्या साहाय्याने गुंतवणूक करतात त्यांच्यासाठी महत्वाची माहिती समोर आली आहे. SEBI ने सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनच्या बाबतीत एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामध्ये आता SIP बंद करण्याची प्रक्रिया फक्त दोन दिवसात पूर्ण होणार आहे. त्यामुळे तुम्हाला जास्त काळ थांबण्याची गरज भासणार नाही. तसेच हा नवीन नियम 1 डिसेंबर 2024 पासून सर्वत्र लागू झाला आहे.
गुतंवणूकदारांसाठी SEBI चा निर्णय –
यापूर्वी SIP बंद करण्यासाठी गुंतवणूकदारांना 10 दिवस आधी प्रक्रिया करावी लागत होती. मात्र SEBI च्या निर्णयामुळे हा अवधी कमी करण्यात आला आहे. म्हणजेच तो 10 दिवसांवरून 2 दिवसांवर आणला आहे. यामुळे गुंतवणूकदारांना त्यांच्या आर्थिक नियोजनावर जलद निर्णय घेण्याची सुविधा मिळत आहे. समजा एखाद्या गुंतवणूकदाराची SIP तारीख 14 असेल आणि त्याच्या खात्यात 11 तारखेला पुरेशी रक्कम नसेल, तर तो 11 तारखेला SIP बंद करण्याची विनंती करू शकतो. या विनंतीवर फंड व्यवस्थापकांना 14 तारखेपूर्वी कारवाई करावी लागेल आणि गुंतवणूकदाराला कोणताही दंड आकारला जाणार नाही.
ऑनलाइन तसेच ऑफलाइन SIP साठी लागू
SEBI ने सांगितल्यानुसार, हा नियम ऑनलाइन तसेच ऑफलाइन SIP गुंतवणुकीसाठी लागू असेल. यामुळे आता गुंतवणूकदारांना SIP बाऊन्स होण्याच्या समस्येपासून सुटका मिळणार आहे , तसेच त्यांच्या बँक खात्यावर अनावश्यक दंड आकारला जाणार नाही. त्यामुळे अनेक गुतंवणूकदारांना दिलासा मिळाला आहे.
गुंतवणूकदारांसाठी फायदेशीर –
SEBI च्या या निर्णयामुळे गुंतवणूकदारांचे हक्क अधिक सुरक्षित होतील. याचसोबत गुंतवणुकीतील पारदर्शकता आणि विश्वास वाढेल. दोन दिवसांच्या मर्यादेमुळे गुंतवणूकदारांना त्यांच्या आर्थिक परिस्थितीनुसार लवचिकता मिळेल, आणि त्यांना दंड आकारल्याची भीतीही राहणार नाही. त्यामुळे हा निर्णय गुंतवणूकदारांसाठी एक मोठा दिलासा देणारा ठरणार आहे.