हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| देशभरातील डिजिटल व्यवहारांमध्ये यूपीआय (Unified Payments Interface) चा वापर मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. काही सेकंदांत व्यवहार पूर्ण होण्याच्या या सुविधेमुळे बहुतांश नागरिक आणि व्यापारी यूपीआयचा नियमित वापर करतात. मात्र, या सुविधेचा अधिक सुरक्षित आणि विश्वासार्ह वापर सुनिश्चित करण्यासाठी नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने काही नवीन नियम लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. हे नियम १ एप्रिल २०२५ पासून लागू होणार आहेत.
नवीन नियम काय आहेत?
एनपीसीआयने बँका आणि यूपीआय सेवा प्रदात्यांना निर्देश दिले आहेत की, १ एप्रिल २०२५ पासून ग्राहकांचे बंद झालेले किंवा इतर कोणाला पुनर्वाटप केलेले मोबाइल क्रमांक यूपीआय प्रणालीतून हटवण्यात यावेत. यामुळे चुकीच्या किंवा अनधिकृत व्यवहारांवर नियंत्रण ठेवता येणार आहे.
सिस्टम अपडेट अनिवार्य
यूपीआय व्यवहारांच्या सुरक्षिततेसाठी बँकांना आणि यूपीआय सेवा प्रदात्यांना त्यांच्या प्रणाली नियमितपणे अपडेट करण्यास सांगण्यात आले आहे. १६ जुलै २०२४ रोजी झालेल्या एनपीसीआयच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला होता. जो नवीन आर्थिक वर्षाच्या सुरुवातीपासून लागू केला जाणार आहे.
यानुसार, बँका आणि यूपीआय सेवा प्रदाते दर आठवड्याला मोबाइल क्रमांकांची अपडेटेड यादी तयार करतील. ही यादी केवळ ग्राहकाच्या संमतीनंतरच अपडेट केली जाणार आहे. ग्राहकांना त्यांच्या यूपीआय अॅपमध्ये एक नोटिफिकेशन मिळेल, ज्या माध्यमातून त्यांना मोबाइल क्रमांक अपडेट करण्याची परवानगी द्यावी लागेल. जर ग्राहकाने संमती दिली नाही, तर संबंधित मोबाइल नंबर यूपीआय व्यवहारांसाठी वापरता येणार नाही.
बँकांना अहवाल देण्याची गरज
यूपीआय सेवा अधिक पारदर्शक आणि सुरक्षित करण्यासाठी बँकांना आणि यूपीआय अॅप सेवा प्रदात्यांना दर महिन्याला एनपीसीआयकडे अहवाल सादर करावा लागणार आहे. या अहवालात अॅक्टिव्ह यूपीआय वापरकर्त्यांची संख्या, यूपीआय व्यवहारांची नोंद समाविष्ट असेल.
त्यामुळे, जर तुम्ही यूपीआयचा नियमित वापर करत असाल, तर येत्या काही महिन्यांत यूपीआय अॅपद्वारे तुमचा मोबाइल क्रमांक अपडेट करावा लागेल. अन्यथा, १ एप्रिल २०२५ नंतर तुमच्या जुन्या किंवा बंद झालेल्या नंबरवर यूपीआय व्यवहार करता येणार नाहीत. हे नवीन नियम यूपीआय व्यवहार अधिक सुरक्षित व्हावा, यासाठी लागू करण्यात येणार आहेत.